नवरात्रोत्सवासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे उद्या संगमनेर शहरात येणार!
◻️ यशोधन मैदानावर आज आणि उद्या दांडिया महोत्सवाचे आयोजन
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर वैभवशाली सुसंस्कृत व राज्याला दिशादर्शक ठरले आहे. नवरात्र उत्सव हा महिला शक्तीचा सन्मान करणारा आहे. त्यामुळे महिला भगिनींसाठी यशोधन मैदानावर शनिवारी सायंकाळी ७ ते १० या वेळेत क्लब दांडिया होणार असून उद्या रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे महिलांसोबत दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहणार आहे. अशी माहिती आयोजक प्रतीक जाजू, रोहन मुर्तडक आणि विनायक गरुडकर यांनी दिली.
शहरातील यशोधन मैदानावर कुटुंब फाउंडेशन, शिवतांडव प्रतिष्ठान, हिंदुराजा प्रतिष्ठान यांच्या वतीने महिलांसाठी मोफत दांडियाचे आयोजन केले आहे. डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत महिला या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये शनिवारी नागपूर येथील प्रसिद्ध गरबा नृत्य दिग्दर्शक यश तुमाने हे देखील उपस्थित राहणार आहेत. रविवारी अभिनेत्री शिवानी सुर्वे रात्री सात ते दहा या वेळेत महिलांसोबत दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
यासाठी यशोधन मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली असून पाऊस येण्याची शक्यता असल्याने भव्य डोम मंडप उभारण्यात आला आहे. याचबरोबर एलईडी स्क्रीन, भव्य स्टेज, महिलांसाठी दांडिया खेळण्याकरता भव्य मैदान, आकर्षक लाइटिंग व्यवस्था, सेल्फी पॉईंट, रील साठी विशेष अद्यावत सुविधा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान या कार्यक्रमासाठी महिला आणि तरुणींना मोफत प्रवेश असणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन कुटुंब फाउंडेशन, शिव तांडव प्रतिष्ठान, हिंदू राजा प्रतिष्ठान आणि एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. तर, शिवानी सुर्वे सोबत दांडिया खेळण्याची हौस होणार पुर्ण होणार असल्याने महिलांसह तरुणींची उत्सुकता देखील शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.