वंचित राहीलेल्या माणसांचा शोध घेऊन विकासाच्या प्रवाहात आणा - मंत्री विखे पाटील
◻️ ‘एकात्म मानवता दर्शन' विचारांच्या हिरक महोत्सवा निमित्त कार्यशाळेचे आयोजन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | पंडीत दिनदयाळ उपाध्याय याचा अंत्योदयाचा विचार समाजाच्या उत्कर्षाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताची वाटचाल त्याच ध्येयाने सुरू असून, विकासा पासून वंचित राहीलेला माणूस शोधण्याचे काम या विचारनेच आपल्या सर्वाना करावे लागणार असल्याचे मत जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार विभागाच्या वतीने 'एकात्म मानवता दर्शन' विचारांच्या हिरक महोत्सवा निमित आयोजित केलेल्या कार्यशाळेत मंत्री विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले. आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, शहर अध्यक्ष अनिल मोहीते, समिती सदस्य विनायक देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, माध्यमिक विभागाच्या जिल्हा शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, सामाजिक विभागाचे सहाय्यक आयुक्त कोरंटीवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे प्रमुख डाॅ. घालमे, शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय आगरकर, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुनिल शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक महाविद्यांचे प्राचार्य आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांनी रुईया महाविद्यालयात १९६५ साली मांडलेला एकात्म मानवता दर्शन हा विचार तत्वज्ञान म्हणून स्विकारले गेले. अंत्योदय मंत्राचा संदेश त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी दिला. समाजातील नाही रे वर्गासाठी अंत्योदयाचा विचार स्विकारल्या गेल्यामुळेच मागील दहा वर्षात देशात झालेले सामाजिक बदल आपण पाहात आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे उद्दीष्ट्य साध्य करताना समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रक्रीयेत सामावून घेण्याचे काम करावे लागणार असल्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, यांत्रिकी युगामध्ये विकासापासून वंचित राहीलेल्या आशा हरवलेल्या माणसांचा शोध घेण्याची संधी या निमित्ताने आपल्या सर्वाना मिळाली आहे.
आज कौशल्य विकासाला मोठे प्राधान्य आहे. नव्या पिढीला रोजगार हवा आहे. यासाठी कौशल्या प्रशिक्षण संस्थांना अधिक कार्यक्षम व्हावे लागेल. आशी अपेक्षा व्यक्त करून रोजगाराची संधी निर्माण करून देण्यात अंत्योदयाचा विचारच दडलेला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
शिक्षण क्षेत्रात मूल्य शिक्षणाला असलेले महत्व लक्षात घेवून या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या माध्यमातून शैक्षणिक धोरण मिळाले. शिक्षणा बरोबरच उद्याची संस्कारीत पिढी घडविण्याचे आवाहन आपल्या सर्वासमोर असल्याने विकास प्रक्रीयेत प्रत्येक माणूस विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून काम करणे हेच विकसित भारतासाठी आपल्या सर्वाचे मोठे योगदान ठरेल आशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी एकात्म मानवता दर्शन हिरक महोत्सवा निमिताने तयार केलेल्या समितीच्या माध्यामातून राबविण्यात आलेल्या उपक्रमात अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून तालुका स्तरावर वक्तृत्व निंबध आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या आता जिल्हा स्तरावर याचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.
शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड विद्यापीठाचे डाॅ. घालमे यांनी आजपर्यत झालेल्या उपक्रमाचा आढाव्याचे सादरीकरण केले.