साकुर पठार भागाला पाणी देणार - आमदार अमोल खताळ
◻️ ४ कोटी ६८ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागात परिवर्तन होणे बाकी असून ते आम्ही विकास कामांच्या माध्यमातून करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये साकुर पठार भागासाठी ४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी दिला आहे. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात सुद्धा भरघोस निधी दिला जाईल. अनेक वर्षापासून जाणून बुजून प्रलंबित ठेवलेला साकुर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबतचा सर्वे जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आला असून या भागाला लवकरच पाणी उपलब्ध करून देऊ. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील हिवरगाव पठारातर्गत येणाऱ्या पायरवाडी, गिरेवाडी, सुतारवाडी, शेंडेवाडी अंतर्गत येणाऱ्या सतीचीवाडी व दारसोंड वाडी, कर्जुले पठारतर्गत येणाऱ्या गुंजाळ वाडी पठार, मांडवे येथील वाडेकर वस्ती, शिंदोडी, बिरेवाडी आणि जांबुत या भागातील रस्ते मजबुतीकरण काँक्रिटी करण पेव्हिंग ब्लॉक शाळा खोली व खुली व्यायामशाळा या सर्व विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन नुकतेच आमदार खताळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी या पठार भागातील वाडी वस्तीवर आलो होतो. निवडून आल्यानंतर विकास कामे घेऊनच गावागावातील जनतेचे आभार मानू असा निर्धार केला होता. त्यानुसार निधी मिळविण्यासाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा केला आणि निधी मिळाला या निधीच्या माध्यमातून काही विकास कामांचे लोकार्पण आणि शुभारंभ केला आहे. या पठार भागात आम्ही विकास कामांच्या माध्यमातूनच परिवर्तन करून दाखवू असाही विश्वास व्यक्त केला.
दरम्यान याप्रसंगी महायुतीचे सर्व प्रमुख प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.