एकविरामुळे महिलांना उद्योग, व्यवसायासाठी मोठी संधी - डॉ. जयश्रीताई थोरात
◻️ यशोधन कार्यालयात ९० प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप
संगमनेर LIVE | युवती व महिला यांना खुले व्यासपीठ मिळावे व त्या सक्षम व्हावे यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन कार्यरत असून विविध उपक्रमामुळे महिलांच्या कल्पकतेला मोठा वाव मिळत आहे. त्यामुळे त्यांना आता उद्योग व व्यवसायासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले.
यशोधन कार्यालय येथे शिलाई मशीन प्रशिक्षणार्थी महिलांना आज डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. सौ. शीलाताई करंजेकर, यशोधन कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन भांड, कार्यालयीन अधीक्षक रामदास तांबडे, डॉ. विजय पवार, सौ. शर्मिला हांडे, रवी सोनवणे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महिलांमध्ये मोठी जिद्द व चिकाटी आहे. फक्त त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने नवनवीन उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. आजच्या युगातील महिला या खऱ्या अर्थाने नवदुर्गा, कर्तुतवान व धाडसी आहे. त्यांना पुढे जाण्यासाठी संधी मिळावी म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन ची स्थापना झाली आहे.
याचा फायदा अनेक महिलांना झाला आहे. महिलांनी आपल्या आयुष्यातील आवड व छंद वेळ देऊन जोपासले पाहिजे. वेळेचे योग्य नियोजन केले तर हे नक्की शक्य होईल. शिलाई मशीन प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी व्यवसाय, उपक्रम सुरू करावे व स्वतःची एक नवी ओळख निर्माण करावी म्हणजे यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. तसेच सध्या नवरात्र उत्सव सुरू असून सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. यानिमित्त तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सौ. शीलाताई करंजेकर यांनी, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. जयश्रीताई थोरात यांनी महिलांना एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्याचा सर्वानी फायदा घेऊन आपला व्यक्तिमत्व विकास करावा असे आवाहन केले.
दरम्यान याप्रसंगी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या ९० महिलांना आज डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महिलांकडून सत्कार व कृतज्ञता
महिला या शिक्षित होऊन संघटित व्हाव्या, त्यांना रोजगाराची संधी मिळावी, त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी एकविरा फाउंडेशनची स्थापना केली. यातून अनेक महिला व युवतींना प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाले आहे. म्हणून आज शिलाई मशीन प्रशिक्षणार्थी महिलांनी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला.