महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमातून भोजापूरसाठी ३० कोटीचा निधी मंजूर
◻️ आमदार अमोल खताळ यांची माहिती; लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा
संगमनेर LIVE | महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या कामाकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून अधिकचा ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. त्यामुळे हा भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे.
राज्यातील ७५ अपूर्ण आणि १५५ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणाली मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पाच्या कामांना महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे. यामध्ये भोजापूर प्रकल्पाचा समावेश केल्याबद्दल आमदार खताळ यांनी महायुती सरकारचे आभार मानले.
याबाबत माहीती देतांना आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यातील भोजापूर चारीचा प्रश्न चाळीस वर्षापासून प्रलंबित होता. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर चारीची दुरुस्ती करण्यास प्राधान्य देवून प्रथम पाणी आणण्यात यश आले. या चारीच्या कामाला राज्य सरकारने १४ कोटी रुपये मंजूर केले होते. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमात नव्याने या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पाच्या वितरण प्रणालीसाठी नव्याने ३० कोटी रुपये देण्याचा ऐतिहसिक निर्णय झाल्याने तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यापुर्वी फक्त आश्वासन मिळाले होते. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष निधीची उपलब्धता करून कामाला सुरूवात होत असल्याने शेतकऱ्यांना नवा विश्वास सरकारने दिला. विधानसभा निवडणुकीपुर्वी पूर चारीला पाणी देणार हा दिलेला शब्द मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेला. आता नव्याने निधीची तरतूद करून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी मिळण्यासाठी महायुती सरकारने घेतलेला निर्णय या भागात सामाजिक परीवर्तन घडविण्यास उपयुक्त ठरेल. असा विश्वास देखील आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.