“आरोग्य संपन्न बालक देशाचे उज्ज्वल भविष्य” डॉ. विखे पाटील हॉस्पिटलचा उपक्रम
◻️ नांदगाव येथे लहान मुलांच्या साप्ताहिक दवाखान्याचे व सर्व रोगनिदान शिबिराचे उदघाटन
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | ग्रामीण भागातील लहान मुलांच्या आरोग्य समस्या सोडविण्याचा संकल्प करत, डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या वतीने नांदगाव येथे साप्ताहिक लहान मुलांचा मोफत दवाखाना व सर्व रोगनिदान शिबिराचे उदघाटन संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. अभिजित दिवटे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या उपक्रमामागे डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन असून, ग्रामीण जनतेच्या आरोग्याविषयीची सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.
“घरात आजार होणार नाही, हाच खरा विकास” - सरपंच सखाराम सरग
“आरोग्य संपन्न बालक हेच देशाचे भविष्य आहे” या संकल्पनेनुसार दवाखान्यात लहान मुलांचे मोफत तपासणी व उपचार होणार असून, आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. दिवटे यांनी केले.
सरपंच सखाराम सरग म्हणाले, “विखे परिवार व हॉस्पिटल प्रशासन नेहमीच नांदगावकरांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांची सामाजिक बांधिलकी ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”
गरीब-गरजूंना दिलासा : ग्रामीण आरोग्य सेवेचा विस्तार
वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. सुनील म्हस्के यांच्या सहकार्याने ग्रामीण आरोग्याच्या विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. त्यामुळे गरीब, सामान्य व गरजूंना दिलासा मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश मोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमा साठी समाज सेवा विभागाचे समन्वयक निलेश दुशिंग यांनी विशेष मेहनत घेतली.
आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा - विखे पाटील परिवाराचा वारसा
ग्रामीण जनतेसाठी आरोग्य हा सर्वात मोठा प्रश्न असून त्यावर उपाययोजना करणे हेच खरे समाजकार्य आहे. डॉ. विखे पाटील परिवाराने बालआरोग्य, महिला आरोग्य आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी उभा केलेला हा उपक्रम म्हणजे समाजाप्रतीची खरी बांधिलकी आहे.
“आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा” हा मूलमंत्र घेऊन सुरु झालेला हा साप्ताहिक दवाखाना आणि सर्व रोगनिदान शिबीर ग्रामीण जनतेच्या आयुष्यात नवा दिलासा ठरेल, असा विश्वास सर्व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी देहरे आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. आर. पी. कसबे, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. सुधीर पायमोडे, डॉ. प्रगती चव्हाण, डॉ. ओंकार, समाजसेवा विभाग प्रमुख संतोष साळवे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. अलका पवार, कार्यकर्ते मनोज दादा पुंड, गट प्रवर्तक सौ. वैशाली गायकवाड, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, नांदगाव व सजलपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.