दहशतीला बळी न पडता विकास कामांच्या मागे उभे रहा - आमदार अमोल खताळ
◻️ साकुर पठार भागातील विविध विकास कामांचा आमदार खताळाच्या हस्ते शुभारंभ
संगमनेर LIVE | गेली चाळीस वर्षापासून तालुक्यात विकास झाला असे दाखवले. परंतु, साकुर पठार भागातील वाडी-वस्त्यांवर अजूनही रस्ते, पाणी व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून जाणून-बुजून वंचित ठेवले गेले. तुमचा फक्त मतासाठी वापर करून तुमच्यावर, दहशत दाखवली गेली. परंतु आता कुणाला ही घाबरू नका, कोणाच्या दबावाला आणि दहशतीला बळी न पडता महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा. तालुक्यातील कुठलेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी आदिवासी बांधवांना दिला.
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत असणाऱ्या सुतारवाडी, पायरवाडी, गिऱ्हेवाडी, शेंडेवाडी, सतीचीवाडी, गुंजाळवाडी पठार, मांडवे, शिंदोडी, बिरेवाडी व जांबुत येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. हिवरगाव पठार येथे मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. याप्रसंगी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तुमच्या भागातील सर्व मूलभूत प्रश्न मार्गी लागले जातील. जसे तुम्ही विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले असेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वजण महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे रहा. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ खऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला पाहिजे यासाठी महायुती पदाधिकाऱ्यांनी काम करावे.
तसेच वेळप्रसंगी या भागात तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत शिबिरे घेऊन या भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांना शालेय दाखले, रेशनकार्ड आणि शासकीय, योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मदत करावी. तुमच्या वाडी वस्तीवरील विजेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून वीज समस्या सोडवली जाईल. पुरंदर धरणातील गळती थांबवण्यासाठी जलसंपदा विभागाला सूचना देऊन गळती थांबवली जाईल, अशी ग्वाही दिली.
दरम्यान साकुर पठार भागात अनेक जण दहशत दादागिरी करत जनतेला त्रास देण्याचे काम करत आहे. त्यांचाही लवकरच बंदोबस्त केला जाईल असे इशारा आमदार खताळ यांनी यावेळी दिला
गावे दत्तक घेऊन विकास होत नाही..
काहींनी याच पठार भागातील एक गाव २५ वर्षापासून दत्तक घेतले होते. मात्र या गावाचा विकास करता आला नाही. मग यांनी नेमका विकास केला तरी काय? असा सवाल उपस्थित करत नुसती गावे दत्तक घेऊन गावांचा विकास होत नाही. त्याला जनतेची कामे करावी लागतात. जनतेने संपूर्ण संगमनेर तालुकाचं मला दत्तक दिला आहे. त्यामुळे या तालुक्याचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. असे आमदार अमोल खताळ म्हणाले.
साकुर पठार भागात लवकरच औद्योगिक वसाहत..
पठार भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठी साकुर पठार भागात औद्योगिक वसाहत सुरू केली जाईल. त्या माध्यमातून या पठार भागातील तरुणांच्या हाताला काम मिळून दिले जाईल. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.