महावितरणकडून संगमनेर विभागात नवीन उपविभाग स्थापनेला मंजुरी
◻️आमदार अमोल खताळ यांच्या पाठ पुराव्याला यश!
◻️ पदनिर्मिती खर्चासह कार्यालय निर्मितीसाठीच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी
संगमनेर LIVE | नाशिक परिमंडळातील अहिल्यानगर मंडळांतर्गत संगमनेर विभागातील विज वितरण सेवांचे कामकाज अधिक सुलभ व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने एक महत्त्व पूर्ण निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी संगमनेर उपविभाग - १ व उपविभाग - २ चे विभाजन करून नवीन संगमनेर उप विभाग - ३ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी उर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून तालुक्यात महावितरणने नवीन उपविभाग - ३ ची स्थापना करण्यास मंजुरी मिळाली आहे.
यामध्ये संगमनेर उपविभाग - ३ च्या आस्थापनेसाठी एकूण १२ पदे निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये उप कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, मुख्य तंत्रज्ञ, लेखा विभागातील लिपिक तसेच शिपाई आदींचा समावेश आहे. या माध्यमातून नागरिकांना जलद व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. शेती पंप धारक संख्या, ग्राहक संख्या आणि व्यवसायिक संख्या मोठ्या स्वरूपात असल्यामुळे सतत अडचणी निर्माण होत होत्या. विज जोडणीसाठी वारंवार होणारा उशीर, तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी लागणारा अधिक वेळ, बिलिंग व मीटर संबंधित तक्रारींचा प्रचंड भार, तसेच ग्रामीण भागात तातडीने सेवा पोहोचवण्यात येणाऱ्या विलंबामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
प्रशासकीय कामकाज उंचावण्याच्या दृष्टीने तसेच अडी-अडचणी सोडवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नवीन उप विभागाची आवश्यकता भासत होती. यासाठी आमदार अमोल खताळ यांनी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान संगमनेर उप विभाग - ३ स्थापन करण्यास परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले आहेत.
महावितरणच्या शाखा कार्यालयांचे पुनर्विभाजनानंतर संगमनेर उप विभाग -१, उपविभाग - २ आणि नवनिर्मित उपविभाग - ३ अंतर्गत शाखा कार्यालयांचे पुनर्वाटप करण्यात आले आहे. उपविभाग - १ अंतर्गत संगमनेर शहर शाखा - १ व २, जवळे कडलग, निमोण, आणि कुरण शाखा. उप विभाग - २ अंतर्गत आश्वी बु।।, आश्वी खुर्द, निमगाव जाळी, वडगावपान, पिंपरणे, जोर्वे आणि तळेगाव शाखा. उप विभाग - ३ अंतर्गत घारगाव १, घारगाव - २, साकुर, चंदनापुरी, धांदरफळ आणि मंगळापुर शाखा कार्यालयाचा समावेश आहे. नवीन उप विभाग - ३ च्या पद निर्मितीसाठी वार्षिक १,२६,७३,०९२ रुपये इतका खर्च तसेच कार्यालय निर्मितीसाठी १२ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरी मिळाली आहे.