पायरेन्स आयबीएमए ला ‘आयकॉनिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर - २०२५’ पुरस्कार
◻️ संस्थेचे सचिव डॉ. निलेश बनकर यांची माहिती
संगमनेर LIVE (लोणी) | दर्जेदार शिक्षणाबरोबरच आदर्श नागरिक घडविण्याच्या कार्यात प्रवरा शैक्षणिक संकुल अव्वल स्थानावर आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक उपक्रमातही पायरेन्स संस्था सदैव सक्रिय आहे. या कार्याची दखल घेत पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अॅड अॅडमिनिस्ट्रेशन (आयबीएमए), लोणी याला ब्रँडस्कॉन्सिल रेटिंग, नवी दिल्ली तर्फे ‘आयकॉनिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर - २०२५’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्यावतीने संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी मुंबई येथे हा पुरस्कार स्वीकारला, अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. निलेश बनकर यांनी दिली.
१९९३ मध्ये लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या महाविद्यालयात सध्या ग्रामीण भागातील सुमारे ५४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नेतृत्व, नवोन्मेष, संशोधन संस्कृती, उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा, कौशल्य विकास केंद्र, नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघ, सौर ऊर्जा वापर, पर्यावरणपूरक कॅम्पस, मुलींसाठी सुरक्षित परिसर, तसेच कमवा व शिका योजना, विद्यार्थी आरोग्य विमा, महिला सक्षमीकरण, लघु संशोधन प्रकल्प यांसारख्या उपक्रमांमुळे महाविद्यालयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रक्षेत्रभेटी, प्लेसमेंट व करीअर मार्गदर्शन अशा उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. अनेक विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले असून विविध औद्योगिक करारदेखील करण्यात आले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे पाटील यांनी अभिनंदन केले.