अमृतवाहिनी महाविद्यालयात युवक महोत्सव जल्लोष २०२५ संपन्न
◻️ पुणे विद्यापीठातील २ हजार विद्यार्थ्याच्या सहभागात विविध सांस्कृतिक कार्यक्रम
संगमनेर LIVE | ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुणवत्तेने देशात अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत २ हजार विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन युवा जल्लोष २०२५ हा संस्मरणीय ठरवला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष २०२५ हा विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सव संपन्न झाला. यावेळी पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, जिल्हा समन्वय प्रा. प्रताप फलफले, डॉ. रमेश पावसे, डॉ. अशोक मरकड आदी उपस्थित होते.
या युवा जल्लोष २०२५ कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील १४३१ स्पर्धक व ६०० सहाय्यक यांनी सहभाग घेतला. या महोत्सवात २७ कला प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये भारतीय समूह गायन, शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन, स्वर वाद्य, वादन, तालवाद्य वादन, पाश्चिमात्य वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकपात्री, अभिनय, एकांकिका, नकला, प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कात्रण कला, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, मेहंदी, स्थळ छायाचित्र, मांडणी कला यांचा समावेश होता.
प्रा. संदीप पालवे म्हणाले की, ग्रामीण भागात असूनही अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालयाने आपली गुणवत्ता देश पातळीवर सिद्ध केली आहे. स्वच्छ वर निसर्गरम्य परिसर सर्व सुविधा गुणवत्ता यांचा परिपूर्ण मिलाप या संस्थेत असून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याने पुणे विद्यापीठातील अग्रमानांकित महाविद्यालय असा अमृतवाहिनीचा कायम उल्लेख होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सौ. शरयूताई देशमुख म्हणाल्या की, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालय हे ऑटोनॉमस झाले असून विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत आहे. विद्यापीठ अंतर्गत असलेल्या अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी या ठिकाणी आले असून एकत्रित होणारा हा युवा जल्लोष अमृतवाहिनी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणार असल्याच्या त्या म्हणाल्या.
या युवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अभिनंदन केले आहे. युवा जल्लोष २०२५ हा करंडक रोजी वाडिया महाविद्यालय पुणे यांनी पटकावला. तर, उपविजेते पद तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांना मिळाले.