अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करा!
◻️ आश्वी येथील सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील निवेदन देणार
संगमनेर LIVE (आश्वी) | अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्याचा मोठा फटका संगमनेर तालुक्यातील शेतीसह दूध व्यवसायाला देखील बसला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यात दि. २६ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी ९० ते १०० मिलीमीटर पेक्षाही अधिक पाऊस झाला. यामुळे येथील शेतीसह पशुधनाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आश्वी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते मोहित गंगाधर गायकवाड यांनी प्रांताधिकांरी अरुण उंडे यांच्याकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करुन तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.
मोहित गायकवाड यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यात अतिवृष्टमुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तसेच या अतिवृष्टीमुळे चारा पिके देखील सडली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे दूध व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
दिवाळीचा सण तोंडावर आला असताना अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतेही निकष न लावता तालुक्यातील शेतीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्याना द्याव्यात. अशी विनंती करून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी निवेदनात केली आहे.
तसेच निवेदनात पुढे म्हटले आहे की, कर्जदार शेतकऱ्यांच्या पाठीमागे पतसंस्था, तसेच इतर बॅकानी वसलीसाठी तगादा लावून नये. यासाठी शासनाने परिपत्रक काढून कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर बॅकानी त्यातून वसूली करु नये, याबाबत देखील निर्देश द्यावेत. अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे तहसिलदार यांना देखील निवेदन देणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.