केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करा
संगमनेर LIVE (शिर्डी ) | देशाचे गृह तथा सहकार मंत्री अमित शहा ५ ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे. शिर्डी शहर भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही माहिती दिली.
शिर्डी येथे भारतीय जनता पार्टी शहर यांच्या वतीने कार्यकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले की, ‘‘आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम रद्द करून काश्मीरला नवा आयाम दिला. ईशान्य भारतात शांतता करार घडवून आणला आणि आसाममध्ये सीमावाद मिटवला. तसेच महाराष्ट्रातील नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. ते शिर्डीला येणे हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे.’’ तसेच लोणी येथे विखे पाटील परिवाराच्या निवासस्थानी दुसऱ्यांदा ते स्नेह भोजनासाठी येत आहेत ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. तर, हे सर्व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वामुळे ते शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले.
मंत्री शहा यांच्या शिर्डी दौऱ्यात शहरात अभूतपूर्व भगव्या रंगाचा देखावा उभारण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. प्रमुख मार्गावर तसेच प्रथमदर्शी ठिकाणी संपूर्ण परिसर सजवण्यात येणार असून, शहरात येणाऱ्यांना गुजरातप्रमाणे भव्य वातावरण अनुभवता येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी स्वागतासाठी समित्या स्थापन करून कार्यकर्त्याना जबाबदाऱ्याचे वाटप करण्यात आले.
डॉ. विखे पुढे म्हणाले, पूर्वी शिर्डीत बैठक बोलावली की खुर्च्या काढाव्या लागत. आज मात्र महिलांना बसण्यासाठी जागा द्यावी लागते, हे परिवर्तन भाजप संघटनेमुळे घडले आहे. कार्यकर्त्याच्या संघटित प्रयत्नांमुळेच शिर्डीमध्ये पक्ष बळकट झाला असून शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर यांचे मोठे योगदान आहे.
शिर्डी शहराध्यक्षपदी तळागाळातील कार्यकर्त्याची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत डॉ. विखे म्हणाले की, आम्ही श्रीमंतीवरून नव्हे तर कार्यकर्त्यांच्या जनमानसातील स्थानावरून नेतृत्व पुढे आणतो. म्हणूनच आमची कार्यकारिणी ही ताकदीची आहे.या निमित्ताने आगामी २०२६ च्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिर्डीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिर्डी येथे प. पु. प्रदीप मिश्रा यांच्या मिरवणुकीचे आयोजन ११ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजता होणार असून, जास्तीत जास्त महिलांना जनजागृती करून या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन शिर्डीतील भाजपा अधिकारी युवक महिला तसेच ग्रामस्थांना केले.
तसेच प्रदीप मिश्रा महाराज यांच्या कार्यक्रम ठिकाणी भव्य असा चार धाम आणि सहा ज्योतिर्लिगांशी जोडणारा अभूतपूर्व सांस्कृतिक देखावा साकारला जाणार असल्याचेही जाहीर केले.