करुले येथील ओढा अतिक्रमणाच्या विळख्यात; शेतकऱ्यासह विद्यार्थ्याचे हाल
◻️ आमदार अमोल खताळ यांना ओढा आणि पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी निवेदन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील करुले शिवारातील ओढा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून ओढ्याचे अस्तित्व नाममात्र शिल्लक आहे. त्यामुळे वाड्या–वस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांना शेतात जाण्यासाठीचा पाणंद रस्ता पूर्णपणे बंद झाला. तर, यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याना देखील त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा ओढा अतिक्रमण मुक्त करावा. यासाठी करुले ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
संगमनेर तालुक्यातील करूले येथील पाझर तलाव ते निळवंडे, या दरम्यान ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांनी विविध बांधकामे करून अतिक्रमण केल्यामुळे ओढा केवळ कागदावरच उरला आहे. या ओढ्याचा उपयोग पाणी वाहून नेण्यासाठी तसेच पाणंद रस्त्यासाठी केला जात असल्याने शेतकऱ्यांसह विद्यार्थ्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर, या ओढ्यात दगड, लाकूड व लोखंडी सळ्या टाकून काहीनी रस्ता बंद केला होता. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी निळवंडेचे कामगार तलाठी यांना रीतसर पंचनामा करण्याचे आदेश दिले.
दरम्यान यावेळी सरपंच बाळासाहेब आहेर, रामनाथ आहेर, शिवाजी आहेर, बाबासाहेब आहेर, राजेंद्र आहेर, गणेश आहेर, भारत बोऱ्हाडे, काशिनाथ बोऱ्हाडे, अमोल आहेर, नितीन आहेर, ऋषिकेश आहेर, सोमनाथ आहेर याच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांना निवेदनाच्या माध्यमातून वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत ओढा अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.