लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचाराची गरज - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
◻️ महात्मा गांधीच्या वेशभूषेतील २०९ विद्यार्थ्यासह भव्य प्रभात फेरी
संगमनेर LIVE | जुलमी ब्रिटिशांविरुद्ध भारतातील गोरगरीब सर्व जातीधर्मातील नागरिकांना एकत्र करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जगामध्ये व भारतामध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्या विचारांची जगाला गरज असून महात्मा गांधींचे विचार घेऊन देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल. असे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५६ वी जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ नामदेव गुंजाळ, डॉ. मैथिली तांबे आदी यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज देशाला व जगाला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांची गरज आहे. देशातील गोरगरीब श्रीमंत सर्व जाती-धर्मातील लोक एकत्र आले आणि गांधीजींच्या नेतृत्वात स्वतंत्र्यलढा दिला. देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांचा विचार जगमान्य आहे. नेल्सन मंडेला यांनी गांधी विचारातून दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रांती घडवली तर गांधी विचारातूनच अमेरिकेमध्ये महिलांना व निग्रो यांना मतदानाचा अधिकार मिळाला.
आज देशांमध्ये द्वेष पसरवला जात आहे, जाती धर्माच्या नावावर भांडण लावली जात आहे, राजकारणाची पोळी भाजली जात आहे. देशात लोकशाही आणि राज्यघटना संकटात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन देशातील लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी मोठी लोक चळवळ उभी करावी लागेल असे ते म्हणाले. याचबरोबर विजयादशमीच्या निमित्ताने त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील जगाने स्वीकारलेली व्यक्तिमत्त्व आहे. महात्माजी हे शांतीचे पुरस्काराचे होते. सत्य आणि अहिंसा हे त्यांचे तत्त्व होते. आज जगामध्ये सर्वाधिक १ लाख ५ हजार पुस्तके त्यांच्यावर असून ७० देशांमध्ये त्यांचे पुतळे आहेत. तर १०५ देशांमध्ये त्यांच्यावर तिकिटे काढली आहे. पारतंत्र्याच्या विरोधात गांधीजींच्या नेतृत्वात मोठा लढा दिला गेला. स्वातंत्र्य मिळाले. आज मात्र, त्यांच्या विचारांना छेद दिला जातो आहे, काही लोक गांधीजींचा द्वेष करतात. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर गांधीजींमुळेच भारताला सन्मान आहे. अहिंसा आणि नैतिकता ही त्यांच्या जीवनाचे तत्व असून त्यांनी आत्मशुद्धीला महत्त्व दिले आहे युवकांनी गांधीजींचे विचार घेऊन पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी साई अकॅडमीचे भगवान अहिरे, प्रा. बाबा खरात, वसंत बंदावणे, सुरेश झावरे, प्रा. प्रकाश पारखे, सुहास आहेर, एस. एम. खेमनर, चांगदेव खेमनर, डॉ. नितीन भांड, अनंत शिंदे, नामदेव कहांडळ, मिलिंद औटी, विनोद राऊत, अविनाश कदम, जय हिंद लोक चळवळीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पारखे आणि नामदेव कहांडळ यांनी केले. जय हिंद चे सचिव डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी आभार मानले.
महात्मा गांधीजींच्या वेशातील २०० विद्यार्थ्याची प्रभात फेरी..
विविध विद्यालयांमधील २०० विद्यार्थ्यानी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा केली. तर ७०० विद्यार्थ्यानी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. यशोधन कार्यालय ते संगमनेर बस स्थानक झालेल्या प्रभात फेरीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या घोषणांबरोबर गांधीजींच्या भजनांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर बस स्थानकावर सुमारे १ हजार विद्यार्थ्यानी एकत्र येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे “वैष्णव जनतो तेरे नाम, रघुपति राघव राजाराम“ या भजनांनी संगमनेर शहर दुमदुमून दिले.