दाढ खुर्द येथे अंबिकामाता नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे सालाबादप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. बुधवार दि. २ रोजी सकाळी अंबिकामाता मंदिरात पारंपारिक पद्धतीने विधिवत पूजाविधी संपन्न झाला व देवीला घटी बसविण्यात आले. त्यानंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
दररोज सकाळी व सायंकाळी देवीला फराळाचा नैवद्य अर्पण करून गावातील महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दररोज संध्याकाळी सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते. पाठ वाचनानंतर आरतीच्या यजमान महिलांकडून सर्वासाठी फराळाची पंगत देण्यात आली. अष्टमीच्या दिवशी देवीचा गोंधळ पार पडला. संपूर्ण नवरात्र काळात महिलांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
यामध्ये दांडिया, चमचा लिंबू स्पर्धा, तळ्यात मळ्यात, उखाणे स्पर्धा, मुलींसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विजयादशमीच्या दिवशी देवीचे विधिवत पूजन करून महाआरती व नैवद्य अर्पण करून नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. नवरात्र काळात एकूण ७०० दुर्गा सप्तशती पाठ पारायण सेवा रुजू झाली. यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पर्वत, दत्तू पर्वत, संदीप जोशी व कैलास जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.