जातीय भेदभावामुळे दलित तरुणाला यूकेमधील नोकरी गमवावी लागली

संगमनेर Live
0
जातीय भेदभावामुळे दलित तरुणाला यूकेमधील नोकरी गमवावी लागली

◻️ ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यावर गंभीर आरोप 

संगमनेर LIVE (पुणे) | ससेक्स विद्यापीठातून नुकत्याच पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुण दलिताला लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील नोकरीची संधी गमवावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे येथील त्याच्या पूर्वीच्या महाविद्यालयाने, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सने, आवश्यक कागदपत्रे सादर करूनही, त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्यास (verify) स्पष्ट नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवली.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स हँडलवर ट्विट करत हा गंभीर जातीय भेदभावाचा प्रकार उघडकीस आणला आहे.

प्रमाणपत्र तपासणीस नकार का?

महाविद्यालयाने प्रमाणपत्र तपासणीस नकार देण्याचे कारण ‘प्रेमची जात’ असल्याचे आहे. नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून यूकेपर्यंत शिक्षणाचा खडतर प्रवास केलेल्या प्रेमला नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी (verification) महाविद्यालयाने ‘जात’ विचारली. विशेष म्हणजे, जेव्हा प्रेम लंडनला शिक्षणासाठी गेला होता, तेव्हा याच महाविद्यालयाने हे प्रमाणपत्र तपासणी करून दिले होते. आता नोकरीसाठी पुन्हा त्याच प्रमाणपत्राची मागणी केली असता, महाविद्यालयाने नकार दिला.

प्राचार्याचा राजकीय संबंध चर्चेत..

मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या या भाजपशी संबंधिथ आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या या राजकीय आणि वैचारिक संबंधावर बोट ठेवत, त्यांच्या कृतींना जातीय पूर्वग्रहाने आकार दिला असण्याची शक्यता वर्तवली आहे.

ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे की, “मनूवादी भाजपशी त्यांचा (प्राचार्याचा) राजकीय आणि वैचारिक संबंध पाहता, त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांविरुद्ध जातीय पूर्वग्रहाने त्यांच्या कृतींना किती आकार दिला असेल याची कल्पना आपण करू शकतो.”

प्रेम बिऱ्हाडेचे हे प्रकरण जातीय भेदभावाचे दुष्टचक्र कसे अजूनही दलित तरुणांना त्रास देत आहे, याचे ज्वलंत उदाहरण आहे. प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या एका होतकरू तरुणाला केवळ त्याच्या ‘जाती’मुळे नोकरी गमवावी लागली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. प्रेमची ही कथा केवळ त्याची एकट्याची नसून, जातीय भेदभावामुळे ज्यांच्या महत्त्वाकांक्षा चिरडल्या जातात, अशा असंख्य दलित विद्यार्थ्याची कथा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान या गंभीर आरोपांवर मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स किंवा प्राचार्या यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !