आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी भाऊबीज सोहळा उत्साहात संपन्न
◻️ भाऊ-बहीणीचं नातं हे केवळ रक्ताचं नसून भावनेचं, विश्वासाचं आणि आपुलकीचं - आमदार खताळ
संगमनेर LIVE | दीपावलीच्या उत्साहानंतर येणारा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण, अर्थात भाऊबीज, आज बुधवारी आमदार खताळ यांच्या निवासस्थानी मोठ्या आनंदात आणि उत्साहात भाऊबीज साजरी करण्यात आली.
राजकीय, सामाजिक जीवनातील व्यस्तता बाजूला ठेवून आमदार अमोल खताळ यांनी आपल्या सर्व भगिनींसोबत हा भावनिक सोहळा साजरा केला. यावेळी निवासस्थानी अत्यंत उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण होते. भाऊबीजेच्या निमित्ताने आमदार खताळ यांच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी पारंपरिक पद्धतीने, अत्यंत मनोभावे, आपल्या भावाला ओवाळले. बहिणींनी लावलेला प्रेमाचा टिळा, ओवाळणीच्या ताटातून आलेली आपुलकी आणि भावाने दिलेले आशीर्वाद यामुळे हा क्षण अधिकच भावनिक झाला. भगिनींनी आपल्या लाडक्या भावाला दीर्घायुष्य आणि यश मिळावे म्हणून प्रार्थना केली, तर आमदार खताळ यांनीही मोठ्या प्रेमाने बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या पाठीशी कायम उभे राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “राजकीय जीवनात कितीही यश मिळाले, तरी बहिणींचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद हीच खरी ऊर्जा असते. माझ्यासाठी माझ्या बहिणींचे प्रेम हे सर्वात मोठे कवच आहे. आज भाऊबीजेच्या निमित्ताने हा गोड आणि भावनिक क्षण अनुभवता आला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. तसेच भाऊ-बहीण यांचं नातं हे केवळ रक्ताचं नसून भावनेचं, विश्वासाचं आणि आपुलकीचं असतं. या नात्यातील प्रेमाचा धागा सदैव मजबूत राहावा, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे.” अशा भावना बोलून दाखवल्या.
हा कौटुंबिक सोहळा केवळ खताळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता, त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व भगिनींना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सुख-दुःखात सोबत राहण्याचे वचन पुन्हा एकदा दृढ केले.
दरम्यान याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्यासह वडील धोंडीबा खताळ आणि बंधू राहुल खताळ यांचेही बहिणींनी औक्षण करून प्रेमळ शुभेच्छा दिल्या. पारंपरिक आरती, फुलांच्या सजावटीने आणि गोड पदार्थाच्या सुगंधाने घरभर सणासुदीची सुगंध दरवळत होता. यावेळी भाऊबहिणींच्या जिव्हाळ्याचे, स्नेहाचे आणि आपुलकीचे क्षण उपस्थित सर्वाचा आनंद द्विगुणित करणारे ठरले.