भाऊबीज हा सण बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक - बाळासाहेब थोरात
◻️ भारतीय जनतेला लोकशाही वाचवण्याचे केले आवाहन
संगमनेर LIVE | निवडणुका या सत्तेकरता किंवा पदाकरता लढायच्या नसून लोकशाही वाचवण्याकरता लढणे गरजेचे आहे. सध्या लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे. त्यामुळे लोकशाही विचारांच्या सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दीपावली हा मानवतेचा संदेश देणारा दीपोत्सव असून भाऊबीज हा सण बहिण भावाच्या नात्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या इंदिरानगर येथील प्रभा निवासस्थानी भाऊबीज प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, डॉ. हर्षल तांबे आदींसह कुटुंबातील सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, वर्षभर प्रत्येकजण कष्ट करतो धावपळ करतो. मात्र, दिवाळीचा हा कालखंड सर्वाच्या जीवनात आनंद देणार असतो. हा समानतेचा बंधू भावाचा मानवतेचा संदेश देणारा असा गोडीचा सण आहे. हा सण सर्वानी आनंदाने साजरा केला पाहिजे. भाऊबीज हा दीपावली मधील महत्त्वाचा उत्सव असून बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण आहे. बहिण भावांमधील जिव्हाळा आपुलकी प्रेम यामधून अधिक दृढ होते.
यावर्षी संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यावर्षी शेतकरी व्यापारी यांची दिवाळी चांगली आहे. मात्र मराठवाडा विदर्भ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही काळजीची गोष्ट आहे. सरकारने अशा शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे आणि राज्यभरातील संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. ही तर आमची प्राथमिक मागणी आहे.
नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये सौ. दुर्गाताई तांबे यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केले. स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर ही संकल्पना प्रभावीपणे राबवली. स्वच्छतेबाबत आणि चांगल्या कामाबाबत हजारो कोटींचे बक्षीसह नगरपालिके करता मिळवले. यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग राहिला आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होत असून समविचारी व लोकशाही वाचवणाऱ्या पक्षाने एकत्र येणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होणार असून राज्यघटना आणि लोकशाही वाचवणे हे पक्षांचे आणि प्रत्येकाचे काम आहे.
निवडणुका ह्या सत्तेसाठी किंवा पदासाठी करायचा नसून देश हितासाठी आणि लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी करायचे असतात. असे सांगताना दीपावली निमित्त सर्व नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सत्यजीत तांबे यानी देखील मनोगत व्यक्त केले. दरम्यान यावेळी डॉ.जयश्री थोरात यांनी आ. सत्यजीत तांबे यांचे सह उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेही औक्षण केले.