‘संधिवातावर फिजिओथेरपीच उपाय कार्यक्षम जीवनाकडे एक पाऊल’
◻️ डॉ. विखे पाटील फाऊंडेशन महाविद्यालयात जागतिक संधिवात दिनानिमित्त तपासणी व मार्गदर्शन शिबीर
संगमनेर LIVE (अहिल्यानगर)| डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या भौतिकउपचार महाविद्यालय, विळद घाट, अहिल्यानगर आणि ग्रामपंचायत नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक संधिवात दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘संधिवात तपासणी, भौतिक उपचार आणि मार्गदर्शन शिबिर’ घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सखाराम सरक, उपसरपंच नाथाभाऊ सरक, महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निलेश दोंड, आणि सुजित जाधव यांच्या हस्ते झाले. शिबिरात तब्बल ३५ रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य भौतिक उपचार व सल्ला देण्यात आला.
फिजिओथेरपी विभागातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी संधिवाताची लक्षणे, शरीरावर होणारा परिणाम, तसेच उपचार पद्धतींचे शास्त्रीय विवेचन केले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत गतीमापन, स्नायूशक्ती आणि संतुलन चाचणी यांसारखी मूल्यांकन साधने प्रत्यक्ष दाखविण्यात आली.
रुग्ण संवाद सत्रात सहभागी रुग्णांनी स्वतःच्या अनुभवांवर चर्चा केली. तज्ज्ञांनी सांगितले की, “नियमित फिजिओथेरप आणि योग्य जीवनशैली अवलंबल्यास संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात, सांध्यांची हालचाल सुधारते आणि रुग्णाची दैनंदिन कार्यक्षमता वाढते.
फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक प्रा. डॉ. अभिजित दिवटे,
प्राचार्य डॉ. श्याम गणवीर, व विभागप्रमुख डॉ. दीपक अनाप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सरपंच सखाराम सरक यांनी ग्रामस्थांच्या वतीने फाउंडेशनचे आभार मानले.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून समाजसेवा विभागाचे निलेश दुशिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान या शिबिरातून “संधिवात म्हणजे शेवट नव्हे - योग्य उपचाराने नवजीवनाची सुरुवात!” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.