सहकारमहर्षी थोरात कारखान्याकडून दीवाळीनिमित्त २५ कोटी बॅकेत वर्ग
◻️प्रति टन २०० प्रमाणे रक्कम खात्यावर जमा होणार असल्याने ऊस उत्पादनामध्ये आनंद
संगमनेर LIVE | कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावलीनिमित्त ऊस उत्पादकांना २०० रुपये प्रति टना प्रमाणे बॅकेत वर्ग करण्यात आली आहे. ऊस विकास अनुदान, ठेव व ठेवीवरील व्याज आणि कामगार बोनस असे एकूण २५.१० कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी दिली.
पांडुरंग घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे. २०२४-२५ हंगामात गळीत झालेल्या ऊसाला प्रति टन २०० प्रमाणे बँकेत वर्ग करण्यात आले आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना ३२०० रुपये प्रति टन भाव मिळाला आहे. याचबरोबर कारखान्याच्या कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे.
कारखान्याने कायम सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून कारखान्याच्या मोठ्या आर्थिक उलाढाली मधून संगमनेर मधील बाजारपेठ समृद्ध झाली आहे. यावर्षी दीपावलीनिमित्त ऊस विकास अनुदानाचे १२.५० कोटी रुपये ठेव व ठेवीवरील व्याज ३.६० कोटी रुपये व कामगार बोनस ९ कोटी रुपये असे एकूण २५.१० कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहातील इतर सहकारी संस्था यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत सुमारे १५० कोटी रुपये येत असून यामुळे बाजारपेठ फुलली आहे. कारखान्याने दीपावली निमित्त दिलेल्या या रकमेमुळे सभासद व कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक, कारखान्याचे कामगार त्यांचे कुटुंबीय शेतकरी व शहरातील व्यापारी बंधू यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याचबरोबर कारखान्याच्या सर्व सभासदांना कारखान्याच्या वतीने ३० किलो मोफत साखर वाटप १५ ऑक्टोबर पासून सुरू झाली असून सर्व सभासदांनी कारखाना कार्यस्थळावर येऊन आपली साखर घेऊन जावे असे आवाहन व्हा. चेअरमन पांडुरंग घुले सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.
संगमनेरच्या बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढणार..
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूहातील सर्व संलग्न संस्थांच्या वतीने दिवाळी निमित्ताने बोनस व इतर देण्यासह सुमारे १५० कोटी बाजारात येणार असल्याने आर्थिक उलाढाल वाढणार आहे. मागील एक वर्षापासून अस्थिर वातावरणामुळे ठप्प झालेल्या बाजारपेठेला दिलासा मिळणार असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.