अध्यात्मिक यज्ञाचा संदर्भ आणि विखे पाटील याचं कौतूक!
◻️ विक्रमी गर्दीचे व्यवस्थापन आणि नेतृत्व ठरला चर्चेचा विषय
संगमनेर LIVE (शिर्डी) | शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात उभारलेल्या शिवनगरीत सुरु असलेल्या शिवमहापुराण कथेने सध्या अहिल्यानगर जिल्ह्यांसह विविध ठिकाणांहून येत असलेल्या भक्तांना वेड लावले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कथेचे प्रवचन प्रसिद्ध कथाकार सिहोरवाले बाबा अर्थात पंडीत प्रदीप मिश्रा देत आहेत. लाखोंच्या भाविकांच्या उपस्थितीमुळे दररोज गर्दीचा उच्चांक मोडला जात आहे.
या विक्रमी गर्दीच्या नियोजनात विखे परिवाराने दाखवलेले व्यवस्थापन आणि नेतृत्व सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. स्वयंसेवकांचे व्यवस्थापन, भोजन, पार्किंग, बैठक व्यवस्था, पंडाल, माईक सिस्टीम, लाईटिंग या सर्व बाबतीत दाखवलेले उत्कृष्ट नियोजन पाहून स्वतः पंडीत प्रदीप मिश्रा महाराजही भावूक झाले. त्यांनी आपल्या निरूपणादरम्यान दररोज विखे परिवाराच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले आहे.
दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनात पंडीत प्रदीप मिश्रा महाराज म्हणाले, “विखे पाटील परिवाराने कार्तिक महिन्यात शिवमहापुराण कथा आयोजित करून भाविकांना लाखो अध्यात्मिक यज्ञाचे पुण्य मिळवून दिले.” महाराजांच्या या विधानाने संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय निर्माण झाला. हा अध्यात्मिक यज्ञ प्राचीन भारतातील एक धार्मिक आणि राजकीय यज्ञ मानला जातो. त्या यज्ञाद्वारे राजा आपल्या साम्राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करीत असे. महाराजांच्या या संदर्भाने कथेचं आध्यात्मिक अधिष्ठान अधिक भव्य स्वरूपात उभं राहिलं असून भाविकांमध्ये या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे.
पंडीत प्रदीप मिश्रा यांनी पुढे सांगितले, “विखे पाटील परिवाराच्या चार पिढ्यांना जनतेचा आशीर्वाद लाभला आहे. आज सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कथा यशस्वीरीत्या पार पडत असून, त्यांच्या नियोजनामुळे लाखो भाविकांना दिव्य अनुभव मिळत आहे. महाराजांनी पुढे म्हटले की, धर्म, समाज, राजकारण आणि आयोजन या सर्व क्षेत्रात सुजय विखे पाटील यांनी समतोल साधला आहे. त्यांनी भक्तीभावातून आयोजन करत सर्व भाविकांचं आशीर्वादरूपी प्रेम मिळवलं आहे.
शिर्डी परिसरात लाखोंच्या गर्दीचं नियोजन सुलभतेने करून दाखवल्यामुळे सुजय विखे यांच्या नेतृत्वगुणांची नवी झलक दिसून आली आहे. कथेच्या आयोजनातून विखे परिवाराने समाजातील भक्तिभावाला दिशा दिली असून या आयोजनामुळे शिर्डी परिसरात अभूतपूर्व श्रद्धा आणि शिस्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. पंडीत प्रदीप मिश्रा महाराजांच्या वाणीतून विखे परिवाराचं कौतुक झाल्यानं ही कथा फक्त आध्यात्मिकच नाही तर सामाजिक आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही एक आदर्श ठरत आहे.