प्रतिदिन विक्रमी ऊसाचे गाळप करणारा प्रकल्प कार्यान्वित - मंत्री विखे पाटील
◻️ पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याच्या ७६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
◻️ सहकार चळवळ वृंध्दीगत करण्याचा वारसा विखे पाटील परिवाराने जोपासला - उध्दव महाराज
संगमनेर LIVE (लोणी) | जेवढे ऊसाचे उत्पादन होईल, तेवढे गाळप करण्याची क्षमता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने निर्माण केली आहे. कारखान्याचा नवा विस्तारीत प्रकल्प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा असून, प्रतिदिन १७ ते १८ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करुन, उच्चांकी गाळपाचे उदिष्ठ यामुळे पुर्ण होईल. असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ हभप उध्दव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हा बॅकेचे संचालक आणासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, चेअरमन नंदू राठी, प्रवरा बॅकेंचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, शिवाजीराव जोंधळे, सोपान शिरसाठ, जिल्हा बॅकेंचे संचालक आंबादास पिसाळ, आण्णासाहेब भोसले, तुकाराम बेंद्रे, मच्छिंद्र थेटे, शांतीनाथ आहेर यांच्यासह कार्यकारी संचालक महेश कोनापुरे उपस्थित होते.
प्रांरभी कारखाना कार्यस्थळावर ऊसाच्या मोळीचे तसेच बैलगाडीचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमापुर्वी जिल्हा बॅकेंचे चेअरमन स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी मंत्री विखे पाटील यांनी कारखान्याने कार्यान्वित केलेल्या नव्या प्रकल्पाच्या उभारणीबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करुन, हा नवीन प्रकल्प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले, यावर्षी पाण्याचे संकट नसले तरी, पावसाचे संकट मोठे आहे. यावर्षी पाण्याची चिंता नाही, धरणं भरली आहेत. दुष्काळी भागामध्येही नंदनवन पाहायला मिळते. याचे एकमेव कारण जिरायती भागाला निवळंडे धरणाचे पाणी उपलब्ध झाले.
अनेक वर्षे या प्रश्नावरुन बदनामी सहन करावी लागली. मात्र काळाच्या ओघात या धरणाच्या बाबतीतील सर्व निर्णय पुढाकार घेवून आपल्यालाच करावे लागले. स्व. मधुकरराव पिचड यांचेही यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले. महायुती सरकारमुळे जिरायती भागाला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकार चळवळला मोठा दिलासा मिळत असून, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी असल्यामुळेच सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले जात आहे.
राज्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये महायुती सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे जाहिर करुन, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. सर्व पीकांचे पावसामुळे नूकसान झाल्याने शेतकरी पुन्हा शाश्वत पिकाकडे वळतील असा अंदाज व्यक्त करुन, सर्व धरणांमध्ये असलेल्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता आपल्या भागामध्ये हेक्टर ऊस उत्पादन आता वाढवावे लागले. या संधीचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहीजे असे आवाहन करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, पुढील दोन वर्ष तरी जायकवाडीला पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी आपला प्रयत्न असून, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न जे खासदार साहेबांनी पाहीले होते ते महायुती सरकारच्या माध्यमातून पुर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
हभप उध्दव महाराज मंडलिक म्हणाले की, या कारखान्याने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. ७५ वर्षाच्या वाटचालीत सहकार चळवळ वृंध्दीगत करण्याचा वारसा विखे पाटील परिवाराने जोपासला. या भागामध्ये सहकार चळवळ आणि संस्था उभ्या राहील्या नसत्या तर समाज कोणत्या स्थितीत असता याचा विचार आपण केला पाहीजे. समाज समृध्द करण्यासाठी सहकारी चळवळीने मोठा हातभार लावला असून, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वात कारखान्याने केलेला विस्तार हा ध्यास घेवून केल्यामुळेच अवघ्या सात महिन्यात उभा राहीलेला हा नवा प्रकल्प मोठे यश देणारा ठरेल.
वारकरी संप्रदाय आणि शेतकरी हा काही वेगळा नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार दरबारी मांडून जी मागणी शेतकरी करीत आहेत ती पुर्णत्वास कशी जाईल या संबधी पाठपुरावा करावा. कारण कोणत्याही प्रश्नात मार्ग काढण्याचा हातखंडा हा मंत्री विखे पाटील यांचा आहे. त्यामुळेच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका शासणाने घेण्याची विनंती उध्दव महाराज मंडलिक यांनी आपल्या भाषणात केली.
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांनी विखे पाटील कारखान्याच्या वाटचालीचा आढावा घेवून अनेक संकटावर मात करुन ही कारखानदारी टिकविण्यात यश मिळविले आहे. आता विस्तारीत प्रकल्पामुळे नव्या संधी आहेत. त्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठबळ देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.