सरन्यायाधीशावर हल्ला होणे हे लोकशाही धोक्यात आल्याचे लक्षण - आशिष शेळके
◻️ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निमगावजाळी येथे रास्तारोको
संगमनेर LIVE | वर्चस्व आणि सत्ता प्रस्थापित करण्यासाठी इग्रजांप्रमाणे ‘फोडा झोडा आणि राज्य करा’ या पध्दतीचा अवलंब करून जाती - धर्मात भेद निर्माण करुन वाद निर्माण करण्याचे काम मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून सुरू आहे. त्यामुळे गाव - गाड्यात असलेले बंधुभावाचे वातावरण खराब होत आहे. बुध्दी आणि स्वकर्तृत्वावर सरन्यायाधीश पदावर पोहचलेल्या व्यक्तीवर हल्ला होणे हे, लोकशाही धोक्यात आल्याचे लक्षण आहे. अशी घणाघाती टिका रिपाइंचे (आठवले) संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी केली.
महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर नुकताच विकृत विचारसरणी असलेल्या व्यक्तीने हल्ला केला होता. त्यामुळे भारतभरात त्यांचे तीव्र पडसाद उमटले. शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर - कोल्हार राज्य महामार्गावर निमगावजाळी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अशिष शेळके बोलत होते.
देशाचे सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य माणूस कसा सुरक्षित राहील? हा प्रश्न आशिष शेळके यांनी उपस्थित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला जर विरोध होत असेल तर, या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी दिला. यावेळी हल्लेखोरांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रा. अनिल मुन्तोडे म्हणाले की, हक्क आणि अधिकार कोणीही फुकट दिलेले नाहीत, ते चळवळीतून मिळवले आहेत. त्यामुळे आंबेडकरी अस्मितेला आवाहन देणाऱ्या विकृत आणि धर्माध शक्तीचे षडयंत्र सामुहिक शक्तीच्या बळावर उलथवून टाकण्यात येईल, असा इशारा दिला.
दरम्यान यावेळी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पोलीसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
याप्रसंगी प्रा. अनिल मुन्तोंडे, कैलास कासार, अनिल बर्डे, एकनाथ खरात, विजय शेळके, अशोक शेळके, रवींद्र शेळके, रावसाहेब पंडित, योगेश मुन्तोंडे, सौ. रुपाली सोनवणे, राजेंद्र मुन्तोंडे, प्रतीक शेळके, रोहित शेळके, भारत गायकवाड, सागर खरात, अनिकेत खरात, अमोल खरात, नानासाहेब कदम, बाळासाहेब कदम, जनार्धन साळवे, सर्जेराव सोनवणे, विजय खरात, सिद्धार्थ खरात, संग्राम शेळके, सोमनाथ खरात, रवी रुपवते, मधुकर सोनवणे, स्वप्नील कदम, अनिल खरात, राहुल बर्डे, आकाश पवार, सागर शिंदे, आनंद केदार, कल्याण कदम, गौरव जगताप, स्वप्निल जगताप, रमेश भोसले, भरत भोसले, जग्गू बर्डे, सुनील कदम, अमोल खरात, गणेश खरात, ओंकार खरात, किरण जगधने, सागर थोरात, शुभम खरात, ओमकार खरात, कैलास खरात आदिंसह पंचक्रोशीतून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.