शिर्डीत ‘श्री साई सोशल मीडिया समिट - २०२५’ चा उत्साहात समारोप
◻️ गायक सोनू निगम यांच्या हस्ते उद्घाटन; तर, टी२० क्रिकेट संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव, अभिनेता सोनू सूद कडून समिटला शुभेच्छा!
◻️ पत्रकार तथा इन्फ्लुएन्सर्स अनिल शेळके यांचा श्री साईबाबा संस्थांनकडून गौरव
◻️ भारतातील २० राज्यांतील ३०० हून अधिक इन्फ्लुएन्सर्स झाले सहभागी
संगमनेर LIVE (शिर्डी) | शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानने ‘श्री साई सोशल मीडिया समिट - २०२५” या भव्य सोहळ्याचे ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी आयोजन केले होते.यामध्ये देशभरातील वीस राज्यांतून आलेल्या ३०० हून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले होते. विशेष म्हणजे इंग्लंड येथून देखील एक अनिवासी भारतीय इन्फ्लुएन्सर्स देखील आला होता. हा सोहळा नुकताच संपन्न झाला.
पहिल्या दिवशी सर्व इन्फ्लुएन्सर्सनी श्री साईबाबांच्या समाधी मंदिर व द्वारकामाईचे दर्शन घेऊन मंदिर परिसर व दर्शन रांग संकुल पाहिले. त्यानंतर त्यांचे शैक्षणिक संकुलातील सभागृह मुख्य कार्यक्रम ठिकाणी आगमन होताच ढोल-ताशा, तुतारीच्या गजरात व गुलाबाचे फुले देऊन पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक व साईभक्त सोनू निगम यांच्या उपस्थितीने संमेलनाची शोभा अधिकच वाढली. त्यांचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन केले.
समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री साई पूजनानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी प्रास्ताविक करून संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. श्री गणेश वंदना व श्री साई पालखीच्या पारंपरिक कार्यक्रमाने समिटची सुरुवात रंगतदार झाली.
यानंतर गायक सोनू निगम यांच्या हस्ते “Blessings Button” या विशेष स्मृतिचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मनोगतात त्यांनी, “मी १९९२ पासून शिर्डीत येत आहे. आज मी येथे काही मागण्यासाठी नाही, तर श्री साईबाबांचे आभार मानण्यासाठी आलो आहे. माझ्या आयुष्यात जे काही मिळाले ते सगळे बाबांच्या कृपेनेच.” अशी भावना व्यक्त करत दोन सुंदर साईभजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
समिटदरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी संस्थानच्या ४० हून अधिक विभागांतून सुरू असलेल्या सेवाकार्याचे प्रेझेंटेशन सादर केले. तर श्री साईबाबांचे जीवनचरित्राचे अभ्यासक श्याम सुरेश, श्री. कृष्णाजी, नरेंद्र नाशिरकर, सुमित पोंडा, शुभ्रम बहेल यांनी श्री साईबाबांच्या महतीबाबत तर आशिष गोळवलकर, प्रसाद पाटील, अपूर्व मानकर, श्वेतांक नाईक यांनी सोशल मीडिया व एआय तंत्रज्ञान या विषयांवर आपले विचार मांडले. तसेच गोपी फिल्म्स चे हर्ष पांड्या यांनी श्री साईबाबा संस्थान वर आधारित तयार केलेल्या 24 Hours Inside The Temple या लघुपटाचे ट्रेलर प्रदर्शित केले.
वक्त्यांच्या मनोगता दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम तर संध्याकाळी शताब्दी मंडपात साई भजन संध्या उत्साहात संपन्न झाली. इन्फ्लुएन्सर्स संवाद सत्रात त्यांनी केलेल्या सूचनांची नोंदी घेतल्या. यानंतर सर्व इन्फ्लुएन्सर्स यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते Blessings Button वाटप करण्यात आले.
दरम्यान याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील पत्रकार तथा इन्फ्लुएन्सर्स अनिल शेळके यांचा श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (IAS) यांच्या हस्ते “Blessings Button” हे विशेष स्मृतिचिन्ह, शाल, उदी आणि प्रसाद देऊन गौरव करण्यात आला
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे - सिनारे, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिलाल पटेल यांनी केले. दरम्यान हे समिट यशस्वी होण्यासाठी संस्थानच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले.