निझर्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ जोंधळे यांचे निधन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ नाना जोंधळे यांचे नकतेच अल्पशा आजाराने निधन झाले, ते ७९ वर्षाचे होते. आध्यात्मिक वारसा आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी त्यांनी केलेले काम हे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याने त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहिली जाते आहे.
हभप एकनाथ नाना जोंधळे हे सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते. कोकणगाव शिवापूरचे सरपंच म्हणून १९७५ ते १९९० पर्यत म्हणजे तब्बल १५ वर्ष काम करताना विविध विकास कामांचा पाया रचला. निझर्णेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीला देखील त्यांनी सुरुवात केली होती.
निझर्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते. मंदिर परिसरात नंदी व पिड प्राणप्रतिष्ठा, निझर्णेश्वर कलशारोहन, गणेश मूर्ती, हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच विठ्ठल - रुख्मिणी मर्ती प्राणप्रतिष्ठा हि महत्त्वाची कामे त्यांच्या कार्यकाळात झाली.
जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर परिसरातील ४ बुरंज बांधकाम, फर्शी बसविणे, कार्यालय व शेड बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक आणि जलजीवन मिशन मधून निझर्णेश्वर व कोकणगावसाठी पिण्याचे पाणी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे गंगागिरीजी महाराज अखंड हरीनाम सप्ताह दरवर्षी पार पडतो.
दरम्यान त्यांच्या निधनानतंर एक सच्चा मार्गदर्शन आणि आधारस्तंभ हरपल्याची भावना निझर्णेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ आणि कोकणगाव शिवापूर ग्रामस्थांनी व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे. दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, तीन मुली, नातवंडे, एक भाऊ, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे.