आश्वी येथे विजयादशमी दिनी बिबट्यांचा भर दिवसा वावर!
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बु।। येथे गुरुवारी दुपारी बिबट्याने महिलांसह नागरीकांना दर्शन दिले. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, दाढ ते आश्वी बु।। रस्त्याच्या कडेला आणि शासकीय विश्रामगृहापासून काही अंतरावर बालोटे वस्ती आणि मोठे व्यापारी कॉम्प्लेक्स आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलाची संख्या देखील मोठी आहे. गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे येथील स्थानिक नागरिक आपले नित्याचे काम करत होते.
यावेळी एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या ज्येष्ठ महिला विद्याताई बालोटे, कपिल बालोटे, रजनी बालोटे, प्रिया बालोटे, सोनी शेख आदिंसह त्या ठिकाणी उभ्या असलेल्या नागरीकाकडे पाहत शांततेत मकाच्या शेतात निघुन गेला. त्यामुळे उपस्थित नागरिक आणि महिलांच्या तोडांतून काही वेळ शब्दचं फुटेनात. यावेळी उपस्थित सर्वाचा भितीने थरकाप उडाला होता.
दरम्यान भर दिवसा लोकवस्ती असलेल्या ठिकाणाहून बिबट्या न घाबरता शांतपणे गेला असला तरी, लंपन क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून प्रगतशील शेतकरी विनायकराव बालोटे, डॉ. अनिल बालोटे, सुधाकर बालोटे, पत्रकार रविंद्र बालोटे, महेश बालोटे, आनंद बालोटे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी कोणतीही दुर्दैवी घटना घडण्याआधी या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.