महावितरण कार्यालयावर शहरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा!
◻️ संगमनेर बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा दिला इशारा
संगमनेर LIVE | मागील एक वर्षापासून संगमनेर शहरामध्ये वाढलेली अस्वस्थता, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वाढलेली अस्वच्छता, अनियमित पाणी व वीज पुरवठा, विजेचा खेळ खंडोबा या गोष्टींमुळे नागरिक त्रस्त झाली असून संगमनेर शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करत आंदोलन केले.
संगमनेर शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर वीज पुरवठा नियमित करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी शहरातील विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठिय्या आंदोलन करत नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील अनेक ठिकाणी वीज वितरणाच्या फार समस्या जाणवत असून अनियमित वीज पुरवठा होतो आहे. कमी जास्त दाबाने होणारा पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याचबरोबर रहदारीच्या रस्त्यांवर वीज वाहकतारांना पडलेला जोड मेन लाईनच्या हाय व्होल्टेज लाईन ला संरक्षण कवच नसल्याने अनेक ठिकाणी जीवितेचा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर इंदिरानगर भागातील वीज वारंवार सकाळी पाणी आले की नेहमी जाते. अनेक ठिकाणी पोल दुरुस्तीचे काम रखडले आहे.
शहरालगच्या भागात व ग्रामीण भागातही विजेची मोठी समस्या असून यामुळे सर्व नागरिक शेतकरी व्यापारी आणि उद्योग क्षेत्रांना अडचणीचा सामना करावा लागतो. विशेषता ग्रामीण व शहरी भागांमध्ये वेळेवर वीजपुरवठा न झाल्याने अनेक कामे प्रलंबित राहतात त्यामुळे वीज वितरण विभागाने तातडीने नियमित वीज पुरवठा करावा. तारा दुरुस्त कराव्या. अशी मागणी करण्यात आली.
यावेळी निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती एखंडे म्हणाल्या की, संगमनेर मध्ये वारंवार वीज वितरण कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी लाईट जात असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, हायदर आली म्हणाले की, अनेक वेळा लाईट जात असल्याने रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या सर्व घटनाला वीज वितरण कार्यालय जबाबदार असून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली.
दरम्यान या ठिय्या आंदोलनानंतर मुख्य अभियंता वट्टमवार यांनी निवेदन स्वीकारले. लवकरात लवकर मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले. वेळेत मागण्या पूर्ण न झाल्यास संगमनेर बस स्थानकासमोर दिवसभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संगमनेर मधील तमाम नागरिक व महिलांनी दिला आहे.