संगमनेर तालुक्यात पर्यटन विकासासाठी २ कोटींच्या निधीला मान्यता
◻️ सेवा - सुविधा, पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार - आमदार अमोल खताळ
संगमनेर LIVE | महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संगमनेर तालुक्यातील विविध देवस्थाने व धार्मिक पर्यटन स्थळांच्या सर्वागीण विकासासाठी एकूण २ कोटींच्या पर्यटन अनुषंगिक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण व आध्यात्मिक पर्यटनाला नवचैतन्य मिळणार आहे.
तालुक्याती देवकौठे येथील जगदंबा माता मंदिरासाठी ५० लाख रुपये, तळेगाव येथील श्री बिरोबा मंदिर परिसरासाठी २० लाख रुपये, गुंजाळवाडी येथील काशी विश्वेश्वर मंदिरासाठी २० लाख रुपये, सोनोशी येथील वटमाई देवी मंदिरासाठी २० लाख रुपये, काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरासाठी २० लाख, संगमनेर बु।। येथील साळीवाडा परिसरातील खंडोबा मंदिरासाठी २० लाख रुपये, लोहारे येथील श्री आवाजीनाथ बाबा देवस्थानासाठी २० लाख, निमज येथील श्री बिरोबा मंदिर परिसरासाठी १५ लाख, तसेच धांदरफळ खु।। येथील बिरोबा मंदिर परिसरासाठी १५ लाख असा दोन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ही कामे राबविली जाणार असून, परिसरा तील सुविधा उभारणी, थीम-आधारित नियोजन, पायाभूत रचना सुदृढ करणे, स्वच्छता व्यवस्था, प्रवेशमार्ग सुधारणा यासारख्या गरजांवर भर दिला जाईल. कामे वेळेवर व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी शासनाने कठोर अटी घातल्या असून निधीचा पारदर्शक वापर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान तालुक्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई तसेच पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.
संगमनेर तालुक्यातील मंदिरांमध्ये निधीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या सुविधा या भाविक, पर्यटक आणि स्थानिकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगार संधी वाढण्यास मदत होईल. भविष्यात संगमनेर तालुका राज्याच्या धार्मिक व ग्रामीण पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे. तसेच तालुक्यातील श्रद्धा स्थानांचे संवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी मिळालेली ही प्रशासकीय मान्यता अत्यंत महत्त्वाची आहे. या कामांमुळे भाविकांसाठी सोयी-सुविधा वाढतील, मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण होईल आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीला चालना मिळेल. अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.