जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटसला’ अकोले तालुक्यातून सुरूवात!

संगमनेर Live
0
जिल्ह्यात ऑपरेशन लोटसला अकोले तालुक्यातून सुरूवात!

◻️ श्रीमती सुनिता भांगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश 


संगमनेर LIVE (अकोले) | जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषित केल्या प्रमाणे जिल्ह्यातील ऑपरेशन लोटसला अकोले तालुक्यातून सुरूवात झाली असून, अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हा. चेअरमन श्रीमती सुनिता भांगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घडवून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुकंले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसला (शरद पवार गट) मोठा धक्का बसला आहे.

दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरात मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आणि भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले होते.लवकरच ऑपरेशन लोटस होणार असे सूचक वक्तव्य करून एकप्रकारे राजकीय धक्कातंत्राचे संकेत दिले होते.

काही दिवसांंपुर्वी माजी आमदार वैभव पिचड, श्रीमती सुनिता भांगरे यांनी मंत्री विखे पाटील यांची दिवाळीत भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. पिचड आणि भांगरे यांच्यात मंत्री विखे पाटील यांनी योग्य समन्वय साधून अकोले तालुक्यातूनच राजकीय धक्कातंत्राला सुरूवात केली आहे.

मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती भांगरे, दिलीप भांगरे यांच्यासह अकोले तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच आणि कार्यकर्त्याचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, जेष्ठ नेते सिताराम भांगरे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे, विनायकराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याबद्दल स्वागत करून तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही आशी ग्वाही देवून सबक साथ सबका विकास या मंत्राने अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. आपण आपल्या भागात चांगले काम करून पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी काम कराल आशी अपेक्षा व्यक्त केली.

मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात भांगरे परीवाराने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन करून अकोले तालुका संपूर्ण भाजपमय करण्यासाठी सर्वाचा झालेल्या पक्ष प्रवेश महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करून अकोले तालुका शत प्रतिशत भाजप करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान माजी आमदार वैभव पिचड यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारने झालेला पक्ष प्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून तालुक्यातील सर्व गट आणि गणात भाजपाचे उमेदवार विजयी करण्यची त्यांनी आश्वासित केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !