संगमनेर नगरपरिषदेवर नागरिकांचा मोर्चा!
◻️ शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी
संगमनेर LIVE | सुरक्षित सुसंस्कृत व वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरामध्ये प्रशासकीयराज मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे. अनियमित लाईट व पाणीपुरवठा याचबरोबर अवैध फ्लेक्सबाजी, मोकाट जनावरांच्या त्रासाला कंटाळून संगमनेर शहरातील नागरिकांनी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढला. येत्या आठ दिवसांमध्ये प्रभावी उपाययोजना करा अन्यथा भव्य आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.
संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरासाठी थेट निळवंडे धरणातून पाईपलाईन कार्यान्वित झाली. मात्र, सध्या शहरांमध्ये अपूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तो सुरळीत व्हावा. शहरातील अस्वच्छता, आरोग्य, रस्त्याची दुरवस्था, अनाधिकृत फ्लेक्स यासह दैनंदिन जीवनात नगरपरिषदेशी संबंधित नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.
यावेळी सर्व आंदोलकांनी नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मुख्याधिकारी श्रीमती धनश्री पवार, नगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख यांनी निवेदन स्वीकारून तातडीने उपाययोजना करू असे आश्वासन दिले.
दरम्यान येत्या आठ दिवसांमध्ये जर या समस्या सुटल्या नाहीत तर, शहरातील नागरिक चक्काजाम आंदोलन करतील असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.