हिवरगाव पावसा येथे महिलेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला!
◻️ सौ. नीलम खताळ आणि डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची केली चौकशी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा शनिवारी सायंकाळी शेतातील काम करून घरी परतणाऱ्या अर्चना संदिप टेमगिरे (वय - ३०) या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यामुळे स्थानिकांच्या मदतीने महिलेला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच आमदार खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ आणि कॉग्रेसच्या डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची चौकशी केली.
या घटनेनंतर हिवरगाव पावसा परिसरात दहशत निर्माण झाली असून वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
महिलेवर बिबट्याने हल्ला झाल्याची माहिती मिळताच सौ. नीलम खताळ यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमी महिलेच्या तब्येतीची विचारपूस करताना डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली. तसेच जखमी महिलेच्या कुटुबियांना धीर दिला. त्याचबरोबर वनविभागाला देखील योग्य त्या सूचना दिल्या.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कॉग्रेसच्या डॉ. जयश्री थोरात यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची आस्तेवाईकपणे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच जखमी महिलेच्या कुटुंबाची देखील भेट घेतली.