संगमनेर तालुक्यातील शेतकरी कन्येचा 'माईलस्टोन'!

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्यातील शेतकरी कन्येचा 'माईलस्टोन'! 

◻️ नित्यश्री ज्ञानलक्ष्मी साकारतेय महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटात भूमिका

◻️ चित्रपट मोठ्या पडद्यावर म्हणजे चित्रपट गृहात जाऊन बघण्याचे केले आवाहन 


संगमनेर LIVE (अनिल शेळके) | अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावातील एका शेतकरी कुटुंबातील आणि गेली पंधरा वर्षे अभिनय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या गुणी अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांना 'झी स्टुडिओ' आणि दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारण्याची महत्त्वाची संधी मिळाली आहे. 

या चित्रपटात त्या शेतकऱ्याच्या बायकोची प्रातिनिधिक भूमिका साकारत असून चित्रपटाच्या मुख्य पोस्टरवर त्यांना स्थान देण्यात आले आहे. तर ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. राज्यभरात मोठा प्रतिसाद या चित्रपटाला मिळत असून नित्यश्रींच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

​१५ वर्षाचा अनुभव, आता 'माईल स्टोन'..

​मूळच्या अहिल्यानगर (पूर्वीच्या अहमदनगर) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील असलेल्या नित्यश्री यांनी मागील पंधरा वर्षापासून एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपट या माध्यमांतून आपला ठसा उमटवला आहे. एकता कपूर यांच्या 'बालाजी टेलिफिल्म'सह प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या तीन अध्यात्मिक आणि पौराणिक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका त्यांनी साकारली आहे. वाक्यासह अनेक मराठी चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

ज्या 'झी स्टुडिओ'ची ओळख केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर आहे, आणि ज्या महेश मांजरेकरांसारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी स्वप्न असते, त्यांच्यासोबत काम करणे हा आपल्या कारकिर्दीतील 'माईल स्टोन' असल्याचे नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांनी सांगितले.

​चित्रपटसृष्टीत स्मिता पाटील यांना प्रेरणास्थान मानणाऱ्या नित्यश्री यांनी अभिनयाबद्दलची आपली भावना व्यक्त करताना संगमनेर लाईव्हला सांगितले की, “वाट्याला येईल ती भूमिका स्वतःला समरस करून जी साकारते, तीच खरी अभिनेत्री असते.”

​या चित्रपटातील त्यांच्या पात्राचे नाव 'लक्ष्मी' आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या आईचे नावही लक्ष्मी असल्याने या भूमिकेशी त्यांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. चित्रपटात त्यांच्या पतीची भूमिका अभिनेता पृथ्वीक प्रताप साकारत असून, त्यांच्या दोन मुलांची भूमिका साकारणाऱ्या दोन्ही बालकलाकारांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, ही विशेष बाब आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले, असे त्यांनी सांगितले.

​शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारा चित्रपट..

प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न, अडीअडचणी आणि दुःख मांडणारा चित्रपट आहे. ​राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. चित्रपटाचे संवाद लेखन सिद्धार्थ साळवी यांनी तर, छायाचित्रण अभिमन्यू डांगे यांनी केले. अभिनेते सयाजी शिंदे, सिद्धार्थ बोडके, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, मंगेश देसाई, विक्रम गायकवाड, शशांक शेडे, सिद्धार्थ जाधव, रोहित माने, विजय निकम, सांची भोईर, पायल जाधव, नयन जाधव अशा अनेक गुणी कलाकारांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान माझ्या कुटुंबाच्या पाठीब्यामुळेचं हा प्रवास करु शकले. माझे आजी आणि आजोबा आज जीवंत असते तर, त्यांना हा चित्रपट पाहून खुप आनंद झाला असता. असे शेवटी नित्यश्री यांनी संगमनेर लाईव्हशी बोलताना सांगितले.

“गेली पंधरा वर्षे मी सातत्याने एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांत काम करत आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तर, तो थेट शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, अडीअडचणी आणि दुःख मांडणारा आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अत्यंत संवेदनशीलतेने हा विषय हाताळला आहे. या चित्रपटातून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश समाजापर्यत पोहोचणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर म्हणजे चित्रपट गृहात जाऊन नक्की बघावा. असे आवाहन अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांनी संगमनेर लाईव्हच्या माध्यमातून केले आहे. 

तसेच मराठी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहापर्यत जात नाही ही खंत व्यक्त करताना खूप कष्टाने आम्ही एक कलाकृती जन्माला घालतो. प्रेक्षकांकडून त्याबदल्यात पाठींबा मिळाला तर आणखी काम करायला हुरूप येतो. असे देखील म्हणाल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !