बॅका व पतसंस्थांमध्ये ९ हजार ५०० कोटींच्या ठेवी हे समृद्धीचे प्रतीक - बाळासाहेब थोरात
◻️ अमृतवाहिनी बॅकेत तालुका पतसंस्था फेडरेशनचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीसाठी दिलेल्या आदर्श तत्वांचे पालन संगमनेर मधील सहकार संस्थांमध्ये केले जात आहे. यामुळे सर्व सहकारी संस्था ह्यात आदर्शवत आहेत. सहकार चळवळ ही जनतेच्या विकासाचे साधन असून ती जपली पाहिजे. असे सांगताना तालुक्यातील बँका व पतसंस्था मिळून ९ हजार ५०० कोटींच्या ठेवी हे तालुक्याच्या समृद्धीचे प्रतीक आहे. असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी अमृतवाहिनी सहकारी बॅकेत संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर तांबे हे होते. सुधाकर जोशी, बापूसाहेब टाक, ॲड. नानासाहेब शिंदे, गणपतराव सांगळे, अण्णासाहेब शिंदे, किसन वाळके, शिवाजी जगताप, विवेक तांबे, ॲड. लक्ष्मण खेमनर, सुशील गुजराती, योगेश उपासनी बापूसाहेब गिरी, राणी प्रसाद मुदडा आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार चळवळ ही सर्वसामान्यांच्या विकासाचे साधन आहे. सहकार चळवळ आपण जपली पाहिजे, टिकवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. बॅकिंग हा व्यवसाय अत्यंत अडचणीचा असून ९० च्या दशकामध्ये पतसंस्था चळवळीला राज्यामध्ये सुरुवात झाली. आज संगमनेर तालुक्यात पतसंस्थांचे मोठे जाळे असून तालुक्यातील बँका व पतसंस्था मिळून सुमारे ९ हजार ५०० कोटींच्या ठेवी आहेत.
बॅकांना अडीच महत्त्वाचे असून अत्यंत काटेकोरपणे सर्वानी कामकाज करावे नवीन नियमांची पालन करावे. चांगली ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारी संस्था यामुळे शहरातील बाजारपेठ फुलली आहे. व्यापार वाढला आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बँकांसह विविध पतसंस्था संगमनेर मध्ये आहे. ही समृद्धी आपल्याला जपायची असून सहकारातून निर्माण झालेली ही परंपरा टिकवण्यासाठी सर्वानी कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. तांबे म्हणाले की, पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये चालू असल्यास सर्व पतसंस्था अत्यंत उत्कृष्टपणे काम करत असून या प्रशिक्षणामधून अनेकांना नवीन योजनांची माहिती मिळणार आहे. याप्रसंगी सुधाकर जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.