ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गटात राजकीय भूकंप!
◻️ पिंपरणे येथील सरपंच, दूध संस्थेचे चेअरमन आणि कार्यकर्त्याचा शिवसेनेत' प्रवेश
◻️ भाजपचे अध्यक्ष गोकुळ दिघे यांचा 'मास्टरस्ट्रोक'
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्याचे राजकारण ढवळून टाकणारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पारंपरिक आणि अभेद्य बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जोर्वे गटात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पिंपरणे येथील दूध संस्थेचे चेअरमन, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यानी थोरात गटाला रामराम ठोकत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. या प्रवेशाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बालेकिल्ल्याला सुरुंग..
जोर्वे गट हा आजवर कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात गटाचा गड मानला जात होता, जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थोरात गटाचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, जसे निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत, तसे या गडाला मोठी गळती लागल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी आश्वी येथे पार पडलेल्या मेळाव्यात थोरात कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यानी विखे गटात प्रवेश केला होता. या धक्क्यातून गट सावरत नाही तोच, आता पिंपरणे येथे दुसरा मोठा हादरा बसला आहे. चेअरमन, सरपंचासह कार्यकर्त्याचा नुकताचं प्रवेश सोहळा पार पडला.
पिंपरणे येथील दूध संस्थेचे चेअरमन तथा दलित चळवळीचे नेते प्रकाश ऊर्फ काका गायकवाड, ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण मरभळ, सदस्य उत्तम राहिंज, निलेश चत्तर, श्रीकांत बागुल तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल बागुल, नानासाहेब गायकवाड, सुरेश गाडेकर, प्रशांत राहिंज आणि शुभम राहिंज या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
विकासकामांचे आकर्षण आणि 'दिघे' यांचा मास्टरस्ट्रोक..
या कार्यकर्त्यानी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोर्वे परिसरात सुरू असलेल्या विकासकामांना प्रभावित होऊन तसेच आमदार अमोल खताळ यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून हे नेतृत्व स्वीकारल्याचे सांगितले.
दरम्यान हा प्रवेश औपचारिकरित्या शिवसेनेत झाला असला तरी, यामागे भाजपचे अध्यक्ष गोकुळ दिघे यांचा 'मास्टरस्ट्रोक' असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दिघे यांच्या अचूक राजकीय मुत्सद्देगिरीमुळेच थोरात यांच्या बालेकिल्ल्यात इतके मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात नवतरुण कार्यकर्त्याची मोठी फळी उभी राहिली आहे. त्यातच, जोर्वे गटातील अनेक गावे पालकमंत्री विखे पाटील यांच्या शिर्डी मतदार संघात येत असल्याने, त्यांची ताकदही येथे मोठी आहे. अंभोरे गणात थोरात गटाच्या कार्यकर्त्यानी त्यांना सोडचिठ्ठी देणे, हा आगामी काळातील निवडणुकीचे गणित बदलणारा निर्णायक क्षण मानला जात आहे.