आश्वी येथे सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी भर दिवसा धाडसी चोरी
◻️ लोकवस्तीतील बंद घर फोडून २ लाख १२ हजारांचा ऐवज लंपास
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये सोमवारी (दि. १०) आठवडे बाजाराच्या दिवशी भर दिवसा चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उघडुन मोठी चोरी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भर वस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
आश्वी - निमगावजाळी रस्त्यावर गावठाण नजीक असलेल्या म्हसे वस्तीवरील रहिवासी लक्ष्मण किसन घोडके यांच्या घरात ही चोरी झाली. घोडके कुटुंब (पत्नी, मुलगा आणि सून) हे सर्व कामावर गेले असल्याने त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले होते आणि लक्ष्मण घोडके हे स्वतः आश्वी बुद्रुक येथे डॉक्टरकडे गेले होते.
घोडके कुटुंब बाहेर असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा म्हणजे सकाळी ९ ते १ वाजेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडले. त्यानंतर आतील खोलीत प्रवेश करून दोन लोखंडी कपाटांची उचकापाचक केली. या कपाटांमधून १ लाख २० हजार रुपये किंमतीची दीड तोळ्याची सोन्याची पोत, ४० हजार रुपये किंमतीचा ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा सर, ३२ हजार रुपये किंमतीचे ४ ग्रॅम वजनाचे कानातले, तसेच २० हजारांची रोख रक्कम असा एकूण २ लाख १२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
दरम्यान याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९१/२०२५ नुसार बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवडे बाजाराच्या दिवशी धाडस..
सोमवारी आश्वी बुद्रुक येथे आठवडे बाजार भरलेला असताना रस्त्यावर लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. अशा वेळी, भर वस्तीतील घरात भर दिवसा चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी दाखवले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक हादरले असून, चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
पोलिसांपुढे तपासाचे तर, नागरिकांपुढे सतर्कतेचे आवाहन..
या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या होणारे हे प्रकार चिंताजनक असून, पोलीसांनी या गंभीर गुन्ह्याचा तातडीने तपास करावा आणि चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, असे आवाहन स्थानिक रहिवाशांनी केले आहे.
दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. घराला कुलूप लावताना दुहेरी सुरक्षा करावी, तसेच शेजारील व्यक्तींना कल्पना देऊन त्यांच्यासोबत संपर्कात राहावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.