कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संतप्त; संगमनेर - कोल्हार महामार्गावर टाकले कांदे
◻️ वडगाव पान येथे कांद्याला प्रति क्विंटल १८० रुपये भाव
संगमनेर LIVE | सध्याचे महायुतीचे केंद्र व राज्य सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी आणि गोरगरिबांचे कोणतेही घेणे देणे नाही. राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे. कांद्याला अवघा १८० रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी शेतकऱ्यांनी पाच ट्रॅक्टर कांदे संगमनेर - कोल्हार महामार्गावर टाकून सरकार विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.
वडगाव पान येथे कांद्याला १८० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या रस्ते दुरुस्तीसाठी सर्व शेतकऱ्यांनी हे पाच ट्रॅक्टर कांदे खड्ड्यांमध्ये टाकले. ही आमच्याकडून सरकारला मदत असे म्हणत घोषणाबाजी केली. यावेळी कारखान्याची माजी चेअरमन बाबा ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांच्यासह युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रातील राज्य सरकार हे शेतकरी विरोधी आहे. त्यांना गोरगरिबांनी शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही. निवडणुकीमध्ये घोषणाबाजी केली की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतीमालाला हमीभाव देऊ. मात्र, असे काही झाले नाही. उलट आज १८० रुपये क्विंटल असा कांद्याला भाव देऊन शेतकऱ्यांची थट्टा करत आहे.
सरकारकडे पैसे नाहीत घोषणाबाजी मात्र खूप करत आहे. रस्त्यांवर खड्डे पडले आहे म्हणून हे खड्डे बुजवण्यासाठी आम्ही कांदे टाकत आहोत असा खोचक टोला देखील लगावला.
दरम्यान यावेळी विक्रम ओहोळ, निलेश थोरात यांनी देखील सरकारच्या धोरणावर कडाडून टिका केली.