दाढ खुर्द भक्तीरसात न्हाऊन निघणार!
◻️ बिरोबा महाराज अखंड हरीनाम सप्ताहाची जय्यत तयारी
सगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील धर्मभूमी श्री क्षेत्र दाढ खुर्द येथे ब्रम्हलीन सदगुरु माणिकगीरी महाराज यांच्या प्रेरणेने बिरोबा महाराज अखंड हरीनाम सप्ताहाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. महंत दत्तगिरि महाराज (श्री क्षेत्र वरवंडी, उंबरेश्वर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या मंगलमय कालावधीत संपन्न होणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने दाढ खुर्द आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये चैतन्याचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
ज्ञानदानाचे पर्व आणि महाप्रसादाचे आयोजन..
या आठ दिवसांच्या सप्ताह काळात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि नामवंत संत, महंत, कीर्तनकार आणि प्रवचनकार त्यांच्या अमृततुल्य वाणीतून भाविकांना ज्ञानदान करणार आहेत. यामुळे परिसरातील भाविकांना एकाच ठिकाणी उच्चकोटीच्या आध्यात्मिक विचारांची पर्वणी मिळणार आहे. सप्ताहाचा एक अविभाज्य भाग म्हणून ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन मोठ्या संख्येने करण्यात आले असून, दररोज हजारो भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात 'आमटी-भाकरी'चा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.
दिवाळी पाडव्याला धर्म ध्वजारोहण..
सप्ताहाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून नुकतेच दिवाळी पाडव्याच्या शुभ महुर्तावर महंत दत्तगिरी महाराज यांचे हस्ते विधिवत धर्म ध्वजारोहण करण्यात आले. या धर्मध्वजाच्या साक्षीने ‘दाढ खुर्द फाटा’ या नियोजित ठिकाणी सप्ताहासाठी आवश्यक असलेल्या भव्य कीर्तन मंडप, महाराजांची कुटी, भजन मंडप, आणि स्वयंपाकासाठीचे किचनशेड उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सप्ताहाच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, आजूबाजूच्या शेतजमिनी पार्किगसाठी तात्पुरत्या स्वरूपात रिकाम्या करण्यात येत आहेत. स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात सरपण गोळा केले जात असून, स्थानिक तरुण वर्ग स्वयंस्फूर्तीने आणि उत्साहाने सरपण फोडण्याचे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. संपूर्ण गावात एकीचे आणि सेवेचे अनोखे दर्शन घडत आहे.
लोकसहभागातून सिद्धीस नेणार सप्ताह..
हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याने, सप्ताह कमिटीने वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे. या कार्याला गावातून आणि परिसरातील दानशूर भाविकांकडून चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या परीने तन, मन, धनाने सप्ताहासाठी योगदान देत आहे.
महंत दत्तगिरी महाराज यांनी नुकतीच सप्ताह मंडप आणि इतर तयारीच्या कामाची पाहणी करून आयोजकांना आवश्यक सूचना दिल्या.
दरम्यान सप्ताह कमिटी आणि दाढ खुर्द पंचक्रोशीच्या वतीने परिसरातील सर्व भाविकांना या अखंड हरिनाम सप्ताहाचा आणि ज्ञानदानाचे श्रवण करून महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.