कवी अनंत फंदी नाट्यगृहासाठी निधी कमी पडू देणार नाही - मंत्री उदय सामंत
◻️ आमदार खताळ यांच्या आग्रहास्तव कवी अनंत फंदी नाट्यगृहाची केली पाहणी
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे अनेक वर्षापासून रखडलेले काम मार्गी लागावे यासाठी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आमदार अमोल खताळ यांच्या आग्रहास्तव या नाट्यगृहाची पाहणी केली. यानंतर त्यांनी या खुल्या नाट्यगृह कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्याचे उद्योग व सांस्कृतिक मंत्री उदय सामंत हे संगमनेर येथे तमाशा कलावंत पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या आग्रहास्तव त्यांनी शहरातील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाला भेट देऊन अपूर्ण राहिलेल्या बांधकामाची पाहणी केली.
यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मंत्री सामंत यांना सांगितले की, “या खुल्या नाट्यगृहाचे काम अनेक वर्षापासून थांबलेले असून, शहरातील नाट्यप्रेमी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.” त्यावर मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या नाट्यगृहाच्या अपूर्ण बांधकामासाठी भरीव स्वरूपाचा निधी मंजूर करून दिला जाईल,” असे आश्वासन दिले.
दरम्यान याप्रसंगी संगमनेर नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य संजयकुमार दळवी, अमित शिंदे, सुप्रसिध्द अभिनेते अंतून तथा बाळासाहेब घोडके, मोहसीन शेख, विशाल कदम, राजू अत्तार, संगमनेर शहरातील नाट्य प्रेमी नागरिक, महायुतीचे कार्यकर्ते व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.