छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण!
◻️ श्रीरामपूर शहराच्या इतिहासातील सुवर्णक्षण; दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | श्रीरामपूर शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा अभूतपूर्व क्षण रविवारी साकारला. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेल्या ‘शिवसृष्टी’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते पार पडले.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास शहर व परिसरातील लाखो शिवभक्तांनी गर्दी केली होती. “जय जय शिवराय”च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा, ही शहरवासियांची तसेच शिवप्रेमींची दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी अनेक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांच्यातील चर्चेची आणि संघर्षाची मालिका दशकानुदशके सुरू होती. जागेच्या वादावरून हा विषय अनेकवेळा अडकला होता. मात्र अखेर योग्य नियोजन, निधी व प्रयत्नांच्या माध्यमातून तो साकार झाला.
या उपक्रमात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून समन्वय साधला आणि काम तातडीने पूर्ण व्हावे म्हणून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा पुतळा आणि परिसराचा विकास वेगाने पूर्ण होऊ शकला, असे मानले जात आहे. पुतळा बसविण्याचे ठिकाण निश्चित होण्यात अनेक वर्षे विलंब झाला असला, तरी अखेर या संघर्षाला यश आलं आणि शहराला आपल्या लाडक्या राजाचा भव्य पुतळा मिळाला.
अनावरणाच्या दिवशी सकाळपासूनच शहरात शिवभक्तांची गर्दी उसळली होती. जय घोष, ढोल-ताशांचे निनाद, भगव्या पताका आणि शिवरायांच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर पुतळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी रांग लावली. अनेकांनी दूरून कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर ‘शिवसृष्टी’ला भेट देऊन महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. शिवभक्तांच्या डोळ्यात त्या ऐतिहासिक क्षणाचे समाधान आणि अभिमान झळकत होते.
शहरातील नगरपरिषदेतर्फे पुतळ्याभोवतीचे सौंदर्यीकरण आणि चबुतऱ्याची उभारणी अत्यंत आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे. नाशिक येथील सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तड मैद यांनी हा अश्वारूढ पुतळा साकारला असून, तो ब्राँझ धातूपासून बनवलेला १२ फूट उंच आहे. पुतळ्याच्या डिझाईनपासून ते परिसराच्या वास्तुरचनेपर्यंत आर्किटेक्ट चव्हाण यांचेही मोलाचे योगदान आहे. पुतळ्याच्या सौंदर्यामुळे ‘शिवसृष्टी’ हे ठिकाण शहराचे नवीन आकर्षण ठरणार आहे.
अनावरणानंतर परिसरात भव्य रोषणाई आणि आतिषबाजीने सोहळा दिमाखदार पद्धतीने उजळून निघाला. उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी डोळ्यांत पाणी आणून समाधान व्यक्त केले की, “आमच्या पिढीत हे स्वप्न साकार झाले.”
राजकीय मतभेद आणि हेवेदावे बाजूला ठेवून सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन या सोहळ्यात सहभाग घेतला. शहरातील शिवप्रेमींनी हा दिवस “श्रीरामपूरचा ऐतिहासिक क्षण” म्हणून साजरा केला. या अनावरणाने श्रीरामपूर शहराच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अभिमानाच्या परंपरेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा केवळ शिल्प नसून, तो श्रीरामपूरकरांच्या भावनांचा, संघर्षाचा आणि एकतेचा प्रतीक ठरणार आहे.