साईबाबांविषयीचे गैरसमज दूर, अजय गौतम आता बाबांवर पुस्तक लिहिणार!
◻️ कोर्टात चूक मान्य करत व्यक्त केला खेद; साईबाबा समाधीचे घेतले दर्शन
संगमनेर LIVE (शिर्डी) | श्री साईबाबा आणि शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानविषयी विविध समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह विधाने करून चर्चेत आलेले अजय गौतम यांनी आज राहाता न्यायालयात हजर राहून आपली चूक स्पष्टपणे मान्य केली. संस्थानने दाखल केलेल्या कायदेशीर दाव्यानंतर गौतम यांनी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेमुळे कायदेशीर लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
गैरसमज दूर, माफी व्यक्त..
सन २०२३ मध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानने कायदेशीर कारवाई सुरू केली होती. आज न्यायालयात हजर राहून अजय गौतम यांनी नमूद केले की, “श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबाबत असलेले गैरसमज माझे दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करणार नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, त्यांची पूर्वीची विधाने अपुऱ्या माहितीतून झालेल्या गैरसमजांवर आधारित होती.
बाबांच्या प्रचारासाठी लवकरच पुस्तक..
न्यायालयातील माफीनाम्यानंतर अजय गौतम यांनी शिर्डीत श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीसाठी उपस्थित राहून दर्शन घेतले. दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्याबद्दल तीव्र खेद व्यक्त केला. यापुढे सकारात्मक भूमिकेतून काम करत, 'मी आता बाबांच्या प्रचार - प्रसारासाठी लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे,' अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.
संस्थानकडून सकारात्मक भूमिकेचे स्वागत..
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अजय गौतम यांच्या या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले. त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केले की, “ज्यांचे अजूनही काही गैरसमज असतील त्यांनी थेट श्री साईबाबा संस्थानशी संपर्क साधावा; अन्यथा बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरूच राहील.” या संपूर्ण प्रक्रियेत संस्थानचे माजी विश्वस्त मोहन जयकर आणि शिर्डी ग्रामस्थ कमलाकर कोते यांनी महत्त्वाचा समन्वय साधला.