सर्वाना सोबत घेऊन संगमनेरचा कायापालट करणार - आमदार अमोल खताळ
◻️ पुढील एक ते दोन दिवसांत उमेदवारांची घोषणा करणार असल्याची दिली माहिती
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली असून, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हे तर 'विकासाच्या मुद्द्यावर' लढली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. महायुतीकडे इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने उमेदवारी जाहीर करण्यास काहीसा विलंब होत असला, तरी येत्या दोन ते तीन दिवसांत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी महायुती जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले की, सर्व उमेदवारांना सोबत घेऊन संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडला जाणार आहे. इच्छुकांची संख्या मोठी असली तरी, उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे सांगताना ४० वर्षे सत्ता भोगणाऱ्यांनी संगमनेरला काय दिले? असा सवाल उपस्थित केला.
आमदार खताळ विरोधकांचा समाचार घेताना म्हणाले की, “ज्यांनी गेल्या ४० वर्षापासून संगमनेरची एकहाती सत्ता भोगली, ते आज जनतेला काय नवीन व्हिजन देणार? संगमनेरात परिवर्तन झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात आम्ही विकासाची गंगा आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शहरासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अनेक वर्षे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेले प्रश्न आम्ही मार्गी लावत आहोत." असे सांगितले.
शहरातील बदलेल्या वातावरणाबद्दल बोलताना आमदार खताळ यांनी विश्वास व्यक्त केला की, संगमनेरकर आता दहशतमुक्त आणि भीतीमुक्त झाले आहेत. भ्रष्टाचाराला थारा न देता, पारदर्शक विकासाला साथ देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. नगरविकास मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या सहकार्याने नगरपरिषदेतील विकासकामांचा जुना बॅकलॉग वेगाने भरून काढला जाईल, अशी ग्वाही दिली.
दरम्यान जसे तालुक्यात परिवर्तन घडले, तसेच नगरपरिषदेतही महायुतीचा झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास आमदार खताळ यांनी याप्रसंगी व्यक्त केला.