बिबट्यांच्या हल्ल्यांना बसणार चाप! विखे पाटलांकडून ८ कोटींचा निधी मंजूर!
◻️ सरकारचे 'हायटेक' पाऊल; ३०० पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि २२ रेस्क्यू वाहने खरेदी केली जाणार
◻️ पकडलेले बिबटे ‘वनतारा’ येथे पाठवले जाणार
संगमनेर LIVE (राहाता) | जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी अत्याधूनिक यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून ८ कोटी १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात बिबट्यांकडून होणाऱ्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेवून पालकमंत्री विखे पाटील हे मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी, वनविभाग यांच्याशी संपर्क साधून उपाय योजनांचा आढावा घेत आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क करुन वन विभागाच्या जिल्हा प्रशासनास अधिकची यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देण्याचे सुचित केले.
या सर्व संकटावर उपाय म्हणून जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला असून, या निधीतून ३०० पिंजरे, ३०० ट्रॅप केमेरे, विविध रेस्क्यु उपकरणे, यामध्ये जॅकेट, शुज, टॉर्च गन्स, प्रोटेक्टीव्ह सिड उपलब्ध केले जाणार असून, तसेच २२ रेस्क्यु वाहने तातडीने खरेदी करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनास दिल्या.
जिल्ह्यामध्ये ११५० बिबटे असल्याची माहीती समोर आल्यानंतर बिबटे पकडण्यासाठी विशेष मोहीम आता राबविली जाणार असून, पकडलेले बिबटे वनतारा येथे पाठविण्याबाबतही वरिष्ठांशी आपली चर्चा झाली असून, त्याची अंमलबजावणी तातडीने करावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय याबाबतचा आढावा घेण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.