सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या वतीने ‘सहकार सप्ताहा’ला सुरुवात
◻️ सहकारामुळे आलेली समृद्धी टिकवण्याची जबाबदारी आपली - पांडुरंग घुले
संगमनेर LIVE | सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम सहकार चळवळीने केले आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली सहकार चळवळ संगमनेर तालुक्यात फुलली आहे. या सहकारी चळवळीमुळे संगमनेर तालुका समृद्ध झाला असून ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंगल घुले यांनी केले. तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सहकार सप्ताह साजरा होत असल्याची माहिती दिली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार सप्ताह ला सुरुवात झाली. यावेळी पांडुरंग घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पांडुरंग घुले म्हणाले की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे. सहकार चळवळीमुळे संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. कारखाना, दूध संघ आणि सर्व शिखर संस्था याचबरोबर गावोगावच्या सहकारी संस्थांमुळे प्रत्येक नागरिकाला मोठी मदत झाली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या चळवळीला जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची असल्याचे ते म्हणाले.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, कारखान्याच्या वतीने होत असलेल्या सहकार सप्ताह निमित्त १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२५ या काळामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत. यामध्ये कामगारांचे आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान वृक्षारोपण संवर्धन याचबरोबर ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दरम्यान याप्रसंगी ध्वजारोहण करून सुरक्षा जवानांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी किरण कानवडे यांनी केले. कृष्णा दिघे यांनी आभार मानले.