पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताच्या विकासाचा पाया घातला - डॉ. सुधीर तांबे

संगमनेर Live
0
पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताच्या विकासाचा पाया घातला - डॉ. सुधीर तांबे 

◻️ यशोधन कार्यालयात पंडित नेहरू व वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी


संगमनेर LIVE | भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय सहभाग घेणारे स्वातंत्र्यसेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे आधुनिक विचारांचे पाईक होते. पंडित नेहरू यांच्या वैज्ञानिक दूरदृष्टीमुळे आधुनिक भारताच्या विकासाचा पाया घातला गेला. असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. याचबरोबर अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यात लिहिलेल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ भारताच्या इतिहासाची साक्ष देणारा ठरला असल्याचे त्यांनी म्हटले.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू व वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर राक्षे, राजेंद्र आव्हाड, किशोर साळवे, गणेश बलसाने, विकी पवार, दत्ता लाहुंडे, आर. के. जाधव, सचिन वाघमारे, संदीप आव्हाड, बाबासाहेब साळवे, संजय जमदाडे, राजेंद्र राक्षे, यशोधन कार्यालयाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड, रामदास तांबडे आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे यांच्यासह अनेक राष्ट्रपुरुषांनी योगदान दिले. याचबरोबर भारताच्या समर्थ लोकशाहीचा पाया घातला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हरितक्रांती आधुनिक विज्ञान क्रांतीचा पाया घातला. धरणे ही तीर्थस्थळे मानून जलसिंचनाच्या योजना राबवल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला सन्मान मिळवून दिला. सर्व धर्म समभाव व विकासाची परंपरा त्यांनी जोपासली.

अहलाबाद येथील आनंदभवन ते पंतप्रधान हा त्यांचा जीवन प्रवास तरुण पिढीसाठी कायम प्रेरणादायी असून अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यात त्यांनी लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया हा समृद्ध भारताच्या इतिहासाची साक्ष देणारा मोठा ठेवा त्यांनी लिहिला आहे.

विज्ञानवादी पंडित नेहरू यांनी इस्रोची स्थापना केली. आयआयटी, अनुशक्ती केंद्र, पंचायत राज सह जगाला पंचशील तत्वांचा शांतीचा मंत्र दिला. मात्र आज जे काहीही करू शकले नाही असे लोक टीका करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

वस्ताद लहुजी साळवे सशस्त्र क्रांतीचे जनक होते. जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी हे ब्रीद घेऊन त्यांनी तरुणांची मोठी फौज ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी उभे केली होती. या सर्व देशभक्तांच्या जीवनकार्यातून युवकांनी आदर्श घेऊन समाजासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान यावेळी संगमनेर शहरातील कार्यकर्ते युवक अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !