छत्रपतींचा एकेरी उल्लेख; कॉग्रेसचे सचिन गुजर यांच्यावर गुन्हा दाखल
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या प्रकरणाने श्रीरामपूर शहराच्या राजकीय वातावरणात जोरदार खळबळ उडाली असून कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गुजर यांनी प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे काही नागरिकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली होती. यानंतर गुजर यांना मारहाण झाल्याचे वृत्त देखील अनेक वृत्तवाहिन्यानी दिले होते.
या मारहाण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली होती. मात्र महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त होत होती. याच पार्श्वभूमीवर ऋषिकेश सरोदे या तरुणाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गुजर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 353(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनाकडून गुजर यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सोशल मिडिया, स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू असून त्यामुळे शहरातील वातावरण तापले आहे.