नाशिक-पुणे रेल्वे दुसऱ्या तालुक्यातून का वळवली? - बाळासाहेब थोरात
◻️ ‘संगमनेर वाचवा! तालुक्यात अमली पदार्थाची तस्करी आणि दहशत वाढली'
◻️ बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट प्रहार
संगमनेर LIVE | संगमनेर शहराला निळवंडेतून थेट पाईपलाईनद्वारे मिळालेले स्वच्छ पाणी आणि शहरात राबवलेल्या शांतता व सुव्यवस्थेच्या योजनांचा उल्लेख करत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मागील एका वर्षात शहरात वाढलेल्या अशांतता आणि अमली पदार्थाच्या तस्करीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. नाशिक-पुणे रेल्वे दुसऱ्या तालुक्यातून का वळवली, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
जनता नगर येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह उमेदवार विश्वासराव मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, सोमेश्वर दिवटे, डॉ. किशोर पवार, बाळकृष्ण महाराज करपे आदी उपस्थित होते.
‘शांतता आणि विकास जपला आता शहरात अस्वस्थता'
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात संगमनेर नगरपालिकेतील तीस वर्षाच्या विकासाचा आढावा घेताना म्हणाले की, इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक हा अद्ययावत रस्ता पूर्ण करणे, तसेच शेतकऱ्यांची मनधरणी करून थेट पाईपलाईन योजना शहरासाठी कार्यान्वित केल्याचे सांगताना “आज स्वच्छ पाणी मिळते आहे, यामागे कोणाचे तरी कष्ट आहे," असे ते म्हणाले. “तीस वर्षामध्ये नगरपालिका अत्यंत आदर्श पद्धतीने चालवली आणि शहरात शांतता, सुव्यवस्था, वैभव निर्माण केले. मात्र, मागील एका वर्षापासून संगमनेरमध्ये अशांतता आणि अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू असल्याचा आरोप करत, "मागील आठवड्यात एका तरुणाचा हात तुटला. हात तुटलेला तरुण आणि तोडणारा कोण होता, हे तपासले पाहिजे," असे थोरात म्हणाले. शहरात ड्रग्ज, इंजेक्शन, नशिल्या गोळ्या उपलब्ध होत आहेत. बाहेरची प्रवृत्ती संगमनेरमध्ये येऊ द्यायची नसून, सर्वानी आपले संगमनेर वाचवण्यासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक-पुणे रेल्वेवर थेट सवाल..
शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा मुद्दा थोरात यांनी उपस्थित केला. पोखरी हवेली येथे रेल्वे स्टेशनसाठी जागा नियोजित असताना, ही महत्त्वाची रेल्वे बाहेरून, दुसऱ्या तालुक्यातून कशी जाते, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, असा सवाल त्यांनी केला.
'निधी आणण्यात आमची पीएचडी'
यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांचा जोरदार समर्थन करताना संगमनेरला मिळणारे पाणी ५० ते १५० टीडीएस (TDS) चे असून, ते अत्यंत शुद्ध आहे. “राज्यात असे कुठेही पाणी नाही. संगमनेरच्या पाण्यावर इतर शहरांच्या निवडणुका लढवल्या जातात," असे तांबे म्हणाले. आगामी काळात एकाच वेळी पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी काम केले जाणार आहे.
ते म्हणाले, बाळासाहेब थोरात यांचा आदर सर्वपक्षीय नेते करतात. कोणत्याही मंत्र्याकडे निधीसाठी कोणीच नाही म्हणत नाही. "विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी झाली आहे," असे तांबे यांनी ठामपणे सांगितले.
बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, त्याच जागेवर १५० फुटी तिरंगा व शहीद स्मारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी नियोजन केले आहे. श्रीरामपूरला आपल्यानंतर महाराजांचा पुतळा होतो, मात्र याबाबत नवीन लोकप्रतिनिधी गप्प आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “विकास कामे आम्ही केली म्हणून आम्ही सांगतो. कुणाच्या निधीवर आम्ही गप्पा मारत नाही," असेही तांबे यांनी स्पष्ट केले.