शाळेच्या युनिफॉर्मवर दुधाचे कॅन, आज १४० म्हशींच्या गोठ्याची मालकीण!
◻️ ज्ञानगंगा विद्यानिकेतनमध्ये कृषीकन्या श्रद्धा ढवण यांनी विद्यार्थ्याना दिला उद्योजकतेचा कानमंत्र
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मांचीहिल संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन येथे नुकतेच एक प्रबोधनाचे आणि प्रेरणादायी सत्र पार पडले. निमित्त होते 'कृषीकन्या' म्हणून ओळख मिळवलेल्या आणि तब्बल १४० म्हशींचा दुमजली गोठा यशस्वीपणे चालवणाऱ्या तरुण उद्योजिका श्रद्धा ढवण यांच्या व्याख्यानाचे. विद्यार्थ्याना लहान वयापासूनच उद्योग व व्यवसायाची गोडी लागावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात उलगडताना श्रद्धा ढवण म्हणाल्या, "वडील अपंग असल्याकारणाने, त्यांना कामात मदत व्हावी व कुटुंबाचे उत्पन्न वाढावे यासाठी मी फक्त दोन म्हशींपासून या व्यवसायाची सुरुवात केली. मी तेव्हा शाळेतच होते. शिक्षण आणि म्हशींचे पालन हा दुहेरी प्रवास सुरू झाला. सुरुवातीला दूध वाहतुकीसाठी मी टू व्हीलर शिकले. शाळेत जात असताना, शाळेच्या युनिफॉर्मवर गाडी आणि दुधाचे कॅन, हे चित्र बघून सगळ्यांना आश्चर्य वाटायचे."
व्यवसाय वाढल्यानंतर पिकअप गाडी घेत, त्या स्वतः चालवत दुधाची वाहतूकही त्यांनी केली. "कोणताही व्यवसाय सुरू करताना अफाट जिद्द असायला हवी," असे त्यांनी ठामपणे सांगितले. "मी मुलगी किंवा महिला आहे, म्हणून हा व्यवसाय करायला मी कधीही लाजले नाही. परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि कामाचे योग्य नियोजन या बळावर महिलाही व्यवसायात उत्तुंग भरारी घेऊ शकतात, याचे मी स्वतः एक उदाहरण आहे."
केवळ दुग्ध व्यवसायावर न थांबता, श्रद्धा यांनी म्हशीच्या शेणापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्पही उभारला. हा गॅस विकून त्यांनी उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत निर्माण केला. “आज स्वतःच्या व्यवसायाच्या आधारावर जीवनात जी उंच भरारी घेता आली, तिचा मला अभिमान आहे. शालेय विद्यार्थ्यानीही लहान वयापासूनच अशा उद्योग-व्यवसायाची आवड निर्माण करायला हवी, यातूनच भविष्यात जीवनाची योग्य दिशा मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेच्या संचालिका नीलिमा गुणे, अध्यक्ष विजय पिसे, प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्रुतीका बारहाते, कृष्णाई देवरे, दिशा खेमनर, काव्या उंबरकर आणि श्रावणी होडगर या विद्यार्थिनींनी केले.