साकूर पठार भागात 'नव्या पर्वा'ची नांदी! १४ गावांच्या उपसा सिंचन योजनेला बळ
◻️ जलसंपदा तथा पालकमंत्री विखे पाटलांकडून कामाला गती देण्याचे निर्देश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त साकूर पठार भागातील १४ गावांसाठी असलेल्या उपसा सिंचन योजनेला अखेर बळ मिळाले आहे. या योजनेचे हस्तांतरण जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे करण्यात आले असून, योजनेच्या कामासाठी तातडीने सर्वेक्षण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी करत कामाला गती देण्याचे निर्देश दिले.
महायूती सरकारने ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून साकूर पठार भागातील १४ गावांतील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. "सर्वेक्षणाबरोबरच योजनेच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाचे संकट पाहिलेल्या साकूर पठार भागात या योजनेमुळे नवे पर्व निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे," अशी ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.
सुरुवातीला सहा गावांपुरती मर्यादित असलेल्या या उपसा सिंचन योजनेत, आणखी आठ गावांचा समावेश करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती या ऐतिहासिक निर्णयामुळे होत असल्याचे मोठे समाधान आहे."
महायुती सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली असून, अतिवृष्टीची मदत म्हणून ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, आमदार अमोल खताळ यांनी युवकांच्या रोजगारासाठी सुरू केलेल्या औद्योगिक वसाहतीच्या प्रयत्नांना आपले संपूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याला यश..
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले. ते म्हणाले, "वर्षानुवर्षे या भागाला पाणी मिळाले नाही, मात्र आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून हा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत झाली आहे." असे म्हटले.
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील धरणांमध्ये अधिकचे पाणी आणण्यासाठी जलसंपदा विभागाचे काम सुरू झाले असून, यामुळे मुळा धरणात १५ टीएमसी पाणी अधिकचे निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात, "एक वर्षापूर्वी नागपूरच्या अधिवेशनात दिलेल्या शब्दाची पूर्तता होत असल्याचा आनंद व्यक्त केला. महायुती सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असताना, काही लोक याचे श्रेय घेण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत," अशी टीका केली. तसेच, औद्योगिक वसाहत साकूर भागातच होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान याप्रसंगी गुलाबराजे भोसले, रऊफ शेख यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी, महायुतीसह मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.