दंडकारण्य अभियानाचे २० वर्षाचे यश; संगमनेरचे डोंगर झाले हिरवेगार
⬜ ‘अमृतवाहिनी' आता शिक्षणाचा राष्ट्रीय ब्रँड - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियाना'मुळे संगमनेर तालुक्यातील उघडे बोडके डोंगर हिरवेगार दिसू लागले आहेत. या अभियानाच्या यशामुळे तालुका अक्षरशः हिरवागार झाला असून, याचसोबत 'अमृतवाहिनी'चे कृषी महाविद्यालय अत्यंत अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होत आहे. चांगल्या गुणवत्तेमुळे अमृतवाहिनी हा देशात शिक्षणाचा ब्रँड ठरला असल्याचे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
सायखिंडी येथे जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूह व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दंडकारण्य अभियानाच्या २० व्या 'आनंद मेळाव्यात' ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. ॲड. माधवराव कानवडे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, लहानु गुंजाळ, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, डॉ. हसमुख जैन, सौ. शरयू ताई देशमुख, डॉ. जयश्री थोरात आदि यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्ष संवर्धनाची संस्कृती वाढली आहे. पिंपळगाव कोझीरा, हरमन हिल, मोरया डोंगर, देवगड, खांडगाव, ईटीपी डोंगर या परिसरामध्ये झालेल्या वृक्षारोपणानंतर हे डोंगर उन्हाळ्यामध्ये सहलीसारखे निसर्गरम्य स्थळ बनले आहेत. वृक्षांमुळे पाऊस चांगला पडत असून, त्यांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
कृषी महाविद्यालयाच्या वतीने अत्याधुनिक इमारतीसह शेतीमधील नवीन प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. येथे अद्ययावत फुटबॉल आणि क्रिकेटचे ग्राउंड लवकरच तयार होणार आहे. जानेवारीमध्ये ९ ते १३ जानेवारी या काळात महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी जागेसाठी मदत केली, त्यांच्या योगदानातून हा परिसर विद्यापीठासारखा होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील सर्व सहकारी व शिक्षण संस्था राज्यात अग्रगण्य आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान सह्याद्री-सातपुडा पर्वतांपर्यंत पोहोचले असून, सप्तशृंगी डोंगरावर ५५ एकर परिसरामध्येही वृक्षारोपण करण्यात आले आहे. वृक्ष संवर्धन आणि वनराई निर्माण करणे ही खरी मानव व ईश्वर सेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुक्यात एकूण ३१ डोंगरांवर वृक्षारोपण व संवर्धन करण्यात आले आहे.
आनंद मेळाव्यात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये विद्यार्थ्यानी ५ एकर परिसरामध्ये ४०० अंबा व १७० चिकू वृक्षांचे रोपण केले. गायक विनोद राऊत आणि २०० विद्यार्थ्यानी एकाच वेळी विविध पर्यावरण संवर्धनाची गीते गायली. फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थेने कृषी महाविद्यालयासाठी ५० एकराच्या परिसरात ड्रीप, रोप, खते, पाईप अशा सर्व सुविधा पुरवल्या आहेत.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी कृषी महाविद्यालयाच्या आगामी प्रकल्पांची घोषणा केली. कृषी महाविद्यालयाच्या वतीने रेशीम उद्योग सुरू करण्यात येत असून, तालुक्यामध्ये २०० शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे. यामुळे शेतीपूरक कृषी रेशीम उद्योग सुरू होईल. या महाविद्यालयाच्या आवारामध्ये काश्मीरच्या धर्तीवर भव्य ट्युलिप गार्डन उभारण्यात येणार आहे. महाविद्यालयात पहिल्याच वर्षी ॲडमिशन फुल झाले असून, महाविद्यालयाची गुणवत्ता टिकवण्यासाठी काम सुरू आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहनराव करंजकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी चिकणी, साईखिंडी व परिसरातील नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाजत गाजत वृक्षदिंडी काढून मान्यवरांचे स्वागत केले.