भारतीय सिनेसृष्टीतील 'सुवर्णयुग' थांबले!
◻️ ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांना मंत्री विखे पाटलांची श्रद्धांजली
संगमनेर LIVE (लोणी) | भारतीय चित्रपटसृष्टीतील करिश्माई आणि रसिकांच्या मनात कायमचे स्थान मिळवलेले अभिनेते धर्मेद्रजी यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, अशी तीव्र भावना जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
धर्मेद्रजींच्या निधनावर शोक व्यक्त करताना मंत्री विखे पाटील यांनी आपला शोकसंदेश जारी केला. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, धर्मेद्रजींनी आपल्या साधेपणातील व्यक्तिमत्वाने आणि अप्रतिम अभिनयाने लाखो रसिकांच्या हृदयांत घर केले होते.
अभिनयाचा तडफदार वारसा..
मंत्री विखे पाटील यांनी त्यांच्या गाजलेल्या भूमिकांचा विशेष उल्लेख केला. 'शोले'मधील धडाडीचा 'वीरू' असो, 'अनुपमा'मधील शांत, प्रेमळ व्यक्तिरेखा असो किंवा 'धरमवीर'मधील त्यांची तडफदार भूमिका असो, या सर्व भूमिका हिंदी चित्रपटसृष्टीचा अमूल्य वारसा बनून राहिल्या आहेत. त्यांचा बहारदार अभिनय आणि तितकेच सहजतेने केलेले संवादकौशल्य दमदार होते, ज्यामुळे कलाक्षेत्रात त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले.
मेहनत आणि निष्ठेचे उदाहरण..
सिनेसृष्टीतील आपल्या संपूर्ण कार्यकाळात धर्मेद्रजींनी प्रचंड मेहनत, जिद्द आणि कलाकार म्हणून असलेली निष्ठा यांचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अनुभवी आणि महान अभिनेता गमावला आहे.
दरम्यान नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेरीस, दिवंगत अभिनेते धर्मेद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली.